दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरची याचिका फेटाळली

0

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एका रेस्टॉरंट-बारने त्यांच्या पबच्या जाहिरातीसाठी गौतम गंभीर हे नाव वापरले होते, ते हटवण्याची मागणी गंभीरने याचिकेद्वारे केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. याचे कारण म्हणजे त्या पबच्या मालकाचे नावही गौतम गंभीरच आहे. त्यामुळे न्यायलयाने ते नाव न वापरण्याची गंभीरची मागणी फेटाळली. पश्‍चिम दिल्लीतील पंजाबी बाक परिसरात डीएसपी आणि कंपनीचे दोन पब आहेत. घुंघरू आणि हवालात अशी त्यांची नावं आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पब मालकाचेही नावही गौतम गंभीर आहे. या पबची जाहिरात बाय गौतम गंभीर अशी केली जाते. मात्र, हे पब आपलेच आहेत अशी लोकांची धारणा होत आहे, त्यामुळे गौतम गंभीर हे नाव हटवावे, अशी मागणी क्रिकेटपटू गंभीरने केली होती. या नावामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही गंभीरने याचिकेत म्हटले होते.

गंभीर टीम इंडियातून बाहेर
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा गौतम गंभीर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. गंभीर शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2016 मध्ये, तर शेवटचा वन डे सामना जानेवारी 2013 मध्ये खेळला आहे. गंभीर हा भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या टी 20 आणि 2011 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. गंभीरने 58 कसोटीत 9 शतके, 22 अर्धशतकांसह 4154 धावा केल्या आहेत, तर त्याने 147 एकदिवसीय 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली असून, 5238 धावा केल्या आहेत. याशिवाय गंभीरने 37 टी ट्वेंटीत 7 अर्धशतकांसह 932 धावा केल्या.