नवी दिल्ली। दिल्ली विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतील वाणिज्य विभागाच्या भिंतीवर दहशतवादी संघटना आयसिसचे समर्थन करणार्या घोषणा लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिवांनी मॉरिस नगर पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
याआधी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील काही भिंतीवर काश्मीरच्या आजादीचे समर्थन आणि भारतविरोधी फलक सापडल्याने तणाव निर्माण झाला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दावा केला की, विद्यापीठाच्या कॅम्पसमधील भिंतीवर इसिस संघटनेच्या समर्थनार्थ मजकूर लिहिलेला आहे. या प्रकाराला जबाबदार असणार्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. अभाविपचा सचिव अंकितसिंग सांगवान म्हणाला की, विद्यापीठाच्या भिंतीवर एसवायएम आयसिस असे लिहिलेले आढळून आले.
या शब्दाचा अर्थ आम्ही आयसिसचे समर्थन करतो असा होतो. विद्यापीठाच्या सामाजिक विभागाच्या इमारतीत नक्षलींना न्याय, अफस्पा आजादी आणि दुसरे काही तरी वेगळ्या भाषेत लिहीण्यात आले होते. याशिवाय या इमारतींच्या काही भिंतीवर आक्षेपार्ह घोषणाही लिहिण्यात आल्या. या प्रकारामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तक्रार केल्यानंतर आयसिसचे समर्थन करणार्या घोषणा लिहिलेल्या भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली, असा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. देशविरोधी कार्य करणार्यांविरुद्ध कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (उत्तर) जतिन नरवाल यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सांगितले आहे.