दिल्ली सरकारकडून मृत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटींची मदत

0

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने १४ मृत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा नर्णय घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि महसूल मंत्री मंत्री कैलास गेहलोत उपस्थित होते.

संरक्षण, पॅरा मिलिटरी, दिल्ली पोलीस आणि अन्य मृत कर्मचाऱ्यांच्या पालकांना आणि विधवा पत्नींना आर्थिक साहाय्य देण्याबाबतच्या प्रकरणांचा विचार करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या १४ कर्मचाऱ्यांपैकी ५ जण दिल्ली अग्निशमन दल, १ जण भारती सैन्यातील आणि ८ जण दिल्ली पोलिसांतील आहे.

कंपनी कमांडर मेजर शहीद अमित सागर (११५ इन्फंट्री बटालियन) असे मदतनिधी जाहीर झालेल्या भारतीय सैनिकाचे नाव आहे. गेल्या वर्षी २५ जानेवारी रोजी सोनामार्गच्या उच्च उंचीच्या परिसरात झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील अग्निशामक सेवेतील सुनील कुमार, मनजीत सिंह, हरि सिंह मीना, हरि ओम आणि विजेंदर पाल सिंह यांचा या यादीत समावेश आहे. दिल्ली पोलीस सेवेतील राम कंवर मीना (मुख्य कॉन्स्टेबल), योगेश कुमार (कॉन्स्टेबल), अब्दुल सबूर खान (हेड कॉन्स्टेबल), आनंद सिंग (कॉन्स्टेबल), बेनेश कुमार (कॉन्स्टेबल), यशवीर सिंग (कॉन्स्टेबल), रवींद्र (कॉन्स्टेबल) आणि दीपक कुमार (कॉन्स्टेबल) यांना हा मदतनिधी जाहीर झाली आहे.