नवी दिल्ली : एनआरसी आणि सीएए विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले होते. या हिंसाचारात ५० पेक्षा अधिक बळी गेले. आठवडा उलटल्यानंतरही परिस्थिती तणावात आहे. दरम्यान दंगलीदरम्यान पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. लाल शर्टात दिसणाऱ्या शाहरुखचा पोलिसांवर बंदुक रोखताना फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. शाहरुख खान असे त्याचे नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातील शामलीमधून अटक करण्यात आली आहे. शाहरुखने पोलिसांवर केवळ पिस्तुल रोखून धरली नव्हती तर त्याने आठ राऊंडदेखील फायर केले होते. अटकेपासून वाचण्यासाठी त्याने पिस्तुल चालवली आणि घटनास्थळावरून पळून गेला.
दिल्लीच्या जाफराबादमध्ये दंगल उसळली असताना शाहरुखने दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर पिस्तुल ताणली होती तसंच ८ राऊंडही फायर केले.
शाहरुख हा दिल्लीच्या उस्मानपूर भागाचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. शाहरुखसोबत त्याचे कुटुंबीय गायब झाले होते. शाहरुखचे वडील साबिर याचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे. ड्रग माफियांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साबिर यालाही एकदा अटक करण्यात आली होती.