पुणे । महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात दरदिवशी डेंग्यूची लागण झालेले 100 नवीन रूग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे, या आजाराने नागरिक हैराण झालेले असताना, महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र, डोळ्यावरील झापड उघडण्यास तयार नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांना जीवाच्या भीतीपोटी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या चार दिवसात शहरात डेंग्यूचे संशयित सुमारे 395 रूग्ण आढळून आले असून चिकनगुनीयाची लागण झालेले सुमारे 15 रूग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही आजार डासांमुळे होणारे आहेत. तर याच अहवालानुसार, डेंग्यूच्या संशयीत रुग्णांची संख्या ही तब्बल 4 हजार 514 वर पोहोचली आहे.
ऑक्टोबरमध्ये 1 हजार 819 रूग्ण
गेल्या काही वर्षांत शहरात डेंग्यूची साथ पसरत असली तरी संपूर्ण वर्षभरातील रुग्णाचा आकडा हा 2 ते अडीच हजारांच्या घरात असायचा. मात्र, जानेवारी ते ऑक्टोबर या 9 महिन्यांच्या कालावधीत यावर्षी सुमारे 4 हजार 514 वर पोहोचली असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग नेमका करतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात यावर्षी जून महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून जून महिन्यात 58, जुलै 228, ऑगस्ट 786, सप्टेंबर 1184 तर ऑक्टोबर महिन्यात तब्बल 1 हजार 819 रूग्ण आढळून आले आहेत. तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात 385 रूग्ण आढळून आल्याने डेंग्यूचे संकट आणखी गडद झाल्याचे चित्र आहे.