कार्यालये तसेच कंपन्यांना मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून होते गर्दी
वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी
लोणावळा : दिवाळी संपली असली तरीही शाळांना आणि खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच कंपन्यांना मिळालेल्या सलग सुट्ट्यांमुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणार्या लोणावळा शहरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. शुक्रवार पासूनच लोणावळ्यात येणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागली होती. मात्र रविवारी ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. दिवाळीच्या सुट्ट्या आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्टीमुळे अनेक कुटुंबियांची, मित्र-मंडळींची एकत्र सुट्टी साजरी करताना दिसत होते. सर्वांना एकत्र अशा सुट्ट्या मिळत नसतात. त्यामुळे या सुट्या ही सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरते. मित्रमंडळी तसेच कुटुंबियांनी एकत्र आनंदाचे क्षण घालवले. त्यामुळे सध्या लोणावळा शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली असून महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
लोणावळ्यास प्रथम पसंती
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत तसेच मित्र मंडळीसोबत काही वेळ एकत्र घालविण्यासाठी बाहेर पडणार्या पर्यटकांची प्रथम पसंती हे नेहमीच एखाद्या थंड हवेच्या पर्यटन स्थळाला असते. त्यातही मुंबई पुण्यासह गुजरात मधून येणार्या पर्यटकांची पसंती ही नेहमीच लोणावळा शहराला राहिली आहे. लोणावळा, खंडाळा ही नेहमी पर्यटकांची पसंत राहिली असून वर्षभर पर्यटक येत असतात. यंदाही पर्यटकांनी लोणावळ्याला पसंती दिल्याने मागील काही दिवसांपासून शहरात पर्यटकांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एक्सप्रेस हायवेवर ही वाहनांची संख्या वाढलेली दिसून येते आहे.
हॉटेल्स झाले फुल
मावळ भाग असल्यामुळे येथे पाऊस मुबलक प्रमाणात होत असतो. त्यातही भूशी धरणावर येणार्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात तर गर्दी असतेच पण हिवाळ्यात व उन्हाळ्यातही गर्दी होत असते. पावसाळा ऋतू सरला असल्याने येथील धबधबे आणि धरणातील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पर्यटक येथील राजमाची पॉईंट, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांना पसंती देताना दिसून येत आहे. शहरातील बहुतेक सर्व हॉटेल्स फुल्ल झाली असून खासगी बंगले देखील पर्यटकांनी फुलले आहेत. ही गर्दी अजून पुढील एक आठवडा कायम राहण्याची शक्यता आहे.