दिवाळी सुटट्यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटकांची गर्दी

0

व्यावसायिकांची दिवाळी झाली गोड

तळेगाव दाभाडे : दिवाळीच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या शासकीय सुट्यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या उत्साही पर्यटकांमुळे यावर्षीची दिवाळी पर्यटन व्यवसाय कारणार्‍या व्यावसायिकांना अतिशय गोड झाल्यामुळे मावळातील व्यावसायिक समाधानी आहेत. यावर्षीचा दिवाळीसण दि.3 ते 9 पर्यंत होता. तर याच सुटीला दुसरा शनिवार आणि रविवार जोडून आल्याने पर्यटकानी मावळ तालुक्यात येऊन पर्यटनाचा आनंद लुटला. यामध्ये लोणावळा, खंडाळा, पवनाधरण परिसर, अंदर मावळ परिसरातील सर्व पर्यटन स्थळे या काळात गर्दिने फुलून गेली होती. तर बर्‍याच ठिकाणी रात्रीच्या वास्तव्याच्या ठिकाणी जागा शिल्लक नव्हत्या.

पर्यटकांच्या संख्येनी उच्चांक

पर्याटकासाठी मावळ परिसरातील उपहारगृहे, ढाबे, कृषीपर्यटन केंद्रे तसेच मोठी हॉटेल्स या ठिकाणच्या व्यवसायिकांनी त्यांची चांगल्या प्रकारे बडदास्त ठेवली होती. या शिवाय टूरिस्ट गाड्या दुचाकी, चारचाकी वाहनामुळे सर्व परिसर गजबजून गेला होता. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी पर्यटकांना सहन करावी लागत होती. शिरगाव येथील प्रतिशिर्डी, घोरवडेश्‍वर, भंडारा डोंगर, कार्ला, दुधीवरे येथील प्रतीपंढरपूर ही धार्मिक स्थळे तसेच भाजे, बेडसे, कार्ला येथील लेण्या आहेत. याशिवाय लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची हे गड किल्ले तर पवना, वळवण, वडिवळे, ठोकळवाडी, कुजागाव, आढले या धरण परिसरात पर्यटकांनी हजेरी लावली होती. शनिवार, रविवारी मात्र या गर्दीचा पर्यटकांच्या संख्येनी उच्चांक केला होता. या सर्व बाबींमुळे मावळातील पर्यटन व्यवसायाला नवी दिशा मिळाल्याचे चिन्ह दिसत होते.