पोलादपूर । मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रूंदीकरणास लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीने झपाटयाने सुरूवात केल्यानंतरही दिविल ते पार्ले येथील महामार्गालगतच्या स्मशानशेडजवळ अपघात होण्याच्या घटना अनाकलनीयरीत्या सुरूच आहेत. त्याचप्रमाणे पोलादपूरनजीकच्या सडवली ग्रामपंचायत हद्दीतील चोळई येथील हनुमान मंदिरालगतचा घाट रस्तादेखील अपघाताचे क्षेत्र म्हणून दिवसेंदिवस धोकादायक होत चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत उंबरकोंड आणि दिविल बंधार्याजवळ स्मशान शेड्स बांधण्यात आल्या आहेत. याठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अपघात होत असून अपघातांचे कारण अनाकलनीय आहे. उंबरकोंड येथील स्मशान ओट्याजवळ झालेल्या अपघातांमध्ये काही मोटारसायकलस्वारांना जीव गमवावे लागले आहेत तर गेल्यावर्षी दिविल बंधार्याजवळील स्मशान शेडजवळ आतापर्यंत 3-4 मोठी प्रवासी वाहने कलंडल्याच्या घटना झाल्या आहेत.
परिणामी, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा नव्याने होणारे रस्ते असून मधोमध मूळचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. दिविल येथे स्मशान शेडजवळील तीव्र वळणामुळे वाहनांवरील नियंत्रण ढळून वाहने स्मशान शेडजवळील कोल्हापुरी तंत्राच्या बंधार्यालगतच्या मोरीमध्ये कोसळून होणार्या अपघातांचे सातत्य यंदाही रविवारी रात्री दिविल बंधार्याजवळ एर्टिगा कार कोसळल्याने कायम राहिले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गावाच्या हद्दीतील तीव्र उतारवळणावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामासाठी आणलेला जेसीबी कोसळून गेल्या महिन्यात अपघात झाला. गेल्या काही वर्षांपासून कशेडी घाटात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत विविध कामे करण्यात येऊनही केवळ ठेकेदारांचे सक्षमीकरण झाले असले तरी जीवघेणे अपघात टाळण्यात या विभागाचे अपयश सातत्याने उघड झाले आहे.
पोलादपूरपासून गोव्याच्या दिशेने केवळ एक कि.मी. अंतरावर चोळई गावापासून कशेडी घाटातील तीव्र वळणे सुरू होतात. साधारणत: कशेडी टॅप वाहतूक पोलीस चौकीपर्यंतचे 12 कि.मी. अंतर आणि तेथून पुढे खेड तालुक्यातील 8 कि.मी. अंतराचा असा एकूण 20 ते 21 कि.मी. अंतराचा हा कशेडी घाट सातत्याने धोकादायक ठरला असून जीवघेण्या अपघातांचे सातत्य टिकवून आहे. याचसोबत कशेडी घाटात दरवर्षी रस्ता रूंदीकरण, धोकादायक वळणे कमी करणे, तीव्र उतार कमी करणे, साईडपट्टयांचे मजबूतीकरण, दूतर्फा गटारांची कामे, संरक्षक कठडे आदी विविध कामे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असल्याचेही सातत्याने दिसून आले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या अपघातांची गांभिर्याने दखल घेण्यात आली नसून अद्याप अपघातांची मालिका कायम सुरू आहे. या वळणांवरील गोव्याकडून घाटरस्ता उतरणार्या वाहनांना मुंबईकडून जाणार्या वाहनांचे अचानक दर्शन होऊन तोपर्यंत अपघात घडत असल्याचे अनेकदा पोलीस पंचनाम्यामध्ये उघड झाले आहे.
मात्र, पूर्वी तेथील अपघाताचे कारण साइडपट्टीवरील वाढलेले गवत असायचे. पण आता लार्सन ऍण्ड टूब्रो कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्टीच्या बाजूनेच रस्ता रूंदीकरणाच्या कामास सुरुवात केल्याने साइडपट्टयाच अस्तित्वात राहिल्या नसल्याचे दिसून येत आहे.