दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी दिव्यांग धोरण

0

जळगाव। दिव्यांगव्यक्तींचे व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसन करुन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्याचे दिव्यांग धोरण येत्या दोन महिन्यात जाहिर करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी अजिंठा विश्रमगृहात आयोजित पत्रकार परीषदेत माहिती दिली. यावेळी त्यांचेसोबत अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जळगाव जि.प.समाजकल्याण सभापती सोनवणे हे उपस्थित होते.

जिल्ह्यात 2 हजार 700 लाभार्थ्यांना लवकरच साहित्याचे वाटप
शून्य ते 6 वर्षे वयोगटातील मुलांचे निदान व उपचार वेळेत झाले तर अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे. दिव्यांगाना आवश्यक त्या साहित्याचे वाटप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेतून व नाविण्यपूर्ण योजनेतून निधीचे वाटप करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात 2 हजार 700 लाभार्थी असून या लाभार्थ्यांना लवकरच साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग स्वावलंबन योजना राबविण्यासाठी 5 टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे.

दिव्यांगांना मिळणार मानधन
दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी व समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या संजय गांधी योजनेतून दरमहा 600 रुपये मानधन देण्यात येते हे मानधन 1 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी शासनस्तरावर चर्चा सुरु आहे. तसेच राज्याचे दिव्यांग धोरण निश्चित करण्याची कार्यवाही सुरु असून यासाठी जनतेकडून अभिप्राय मागविण्यात असून विचार करून दोन महिन्यात राज्याचे दिव्यांग धोरण निश्चित करण्यात येणार आहे.

नोकरीत 3 टक्के जागा
दिव्यांगाच्या शासन सेवेतील राखीव 3 टक्के जागा भरण्यासाठी सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगून जळगाव जिल्ह्यात ‘दीपस्तंभ’ उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा विचार करण्यात येईल. असेही यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबिवण्यात येत आहे. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी शासनस्तरावरुन कार्यवाही करण्यात येत आहे.