दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळविले
पिंपरी : पिंपरी परिसरात राहणारी दिव्यांग जलतरणपटू वैष्णवी जगताप हीने दहावी परिक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. वैष्णवीला ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दोन महिने आणि आजारपणामुळे महिनाभर दवाखान्यात राहावे लागले होते. तरीही जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळविले आहेत. त्याबरोबरच 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविण्याची वडिलांबरोबर लावलेली 15 हजार रुपयांची पैजही जिंकली. दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाच ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैष्णवीने अपंग खेळाडूंच्या एस-8 गटात सातवे स्थान मिळविले होते. खेळ आणि अभ्यास यांचे उत्तम संतुलन राखत दहावीत सहा विषयांत 500 पैकी 414 गुण प्राप्त केले आहेत. याखेरीज, तिला क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्याबद्दल 20 टक्के जादा गुण मिळाले आहेत.
खूप चांगली कामगिरी केली
मुलीने मिळविलेल्या यशाबाबत वडील विनोद जगताप म्हणाले की, दहावीची परीक्षा महत्त्वाची असताना वैष्णवी आजारी होती. महिनाभर आजारपणामुळे ती अॅडमीट होती. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेमुळे ती दोन महिने गुंतून पडली. मला खरे तर ती 70 ते 75 टक्के गुण मिळवेल, अशी अपेक्षा होती. 75 टक्के गुण मिळविण्याची तिच्याबरोबर पैजही लावली होती. 75 टक्के मिळविल्यास 5 हजार रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एका टक्क्याला 1 हजार रुपये बक्षीस देण्याचे कबूल केले होते. सर्व अडचणी आणि स्पर्धा काळातील दिवस वाया जाऊनही तिने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पैजेप्रमाणे मी तिला आता रक्कम देणार आहे.
विज्ञानशाखेत घेणार शिक्षण
पिंपरी कॅम्प येथील जयहिंद हायस्कूलमध्ये वैष्णवी शिकत होती. तिला आता विज्ञान शाखेमधून पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. परंतु खेळ आणि शाळेतील हजेरी यांचा ताळमेळ घालण्यासाठी सहकार्य करणार्या महाविद्यालयात तिला प्रवेश देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.