शिक्षणाला संस्कारांची जोड मिळल्यास सुसंस्कृत समाजनिर्मिती होईल
राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज यांनी केले मार्गदर्शन
चिंचवडः शिक्षणामुळे आजचे युग सर्व युगातील श्रेष्ठ व ऐतिहासिक युग आहे. विज्ञानातून प्रगती साधत प्रत्यक्ष स्वर्ग भूतलावर तरवण्याचे कार्य मानवाने केले आहे. त्यामुळे सर्वांची मोठी प्रगती झाली असली तरी संस्कारांचा अभाव असल्याने दुराचारही वाढला आहे. मुलांना शिक्षण देताना त्यांना संस्कार देण्याचा विसर पडतो. आपल्या संस्कृतीत 16 संस्कार सांगितले आहेत. मातेच्या पोटात मुल वाढू लागल्यावरच गर्भसंस्कार करावे अशी शिकवण दिली जाते. आजकाल तरुणाई व्यसन आणि फॅशनमध्ये गुरफटली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली असते. यासाठी घरात अनुशासन असणे अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षणाला संस्कारांची जोड मिळाली तरच सुसंस्कृत समाजनिर्मिती होईल, असे मत राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज यांनी केले. मोरया मंगल कार्यालय प्रांगणात सुरू असलेल्या दिव्य सत्संग सोहळ्यात ‘अपने बच्चो को कैसे करें संस्कारित’ या विषयावर प्रवचन देताना राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज, डॉ. शांतीप्रियजी महाराज उपस्थित होते. याप्रसंगी चंपालाल ओसवाल, पंकज बाफना, दिलीप सोनगरा, राजू जैन, मनोज बफना, प्रसन्ना छपरा, मयुर सिंगवी, प्रफुल्ल बर्डी, विशाल गूगल आदी उपस्थित होते.
गर्भातच संस्कार व्हायला हवेत
राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज पुढे म्हणाले की, मुल मातेच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्यावर संस्कार व्हायला हवेत. अशा संस्कारांमुळेच भगवान महावीर, प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारच्या विभूती जन्माला येतात. आज विज्ञानामुळे जगाची खुप मोठी प्रगती झाली आहे. पूर्वी कल्पनेत असलेली विमाने, संपर्क साधने प्रत्यक्षात उतरली आहेत. मोबाईल, इंटरनेट, टिव्हीमुळे जग खूप जवळ आले आहे. असे असले तरी समाजात, कुटुंबात चांगले विचार हरवले आहेत. गडगंज श्रीमंत असलेल्या घरातील मुले संपत्तीच्या हव्यासापोटी आई वडीलांना दूर लोटतात.
संस्कार व जीवनमूल्य आवश्यक
चंद्रप्रभजी महाराज पुढे म्हणाले की, मुले व्यसनाधीन होतात. याला कारण म्हणजे मुलांना चांगले शिक्षण, सुखसुविधा देताना त्यांच्यावर संस्कार करण्याचा विसर पडतो. घरात कार असेल तर ते समृध्दीचे प्रतिक असते. परंतु घर संस्कारी असेल तर ते संस्कृतीचे प्रतिक असते. शिक्षणाबरोबरच संस्कार व जीवनमूल्य आवश्यक आहेत. लहान मुलाने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरल्यावर ते थोडावेळ रडते. मात्र त्याला संस्कार दिले नाही तर ते तुम्हाला जन्मभर रडायला लावते, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. संस्कारांसाठी सर्वात मोठी गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे अनुशासन. कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येकाने घराला शिस्त लावलीच पाहिजे. इंग्रजी डिसिप्लीन शब्दाच्या वर्णांना संख्या मानल्यास त्याची बेरीज 100 होते. जीवनात 100 टक्के यशासाठी याच डिसिप्लीनची आवश्यकता असते. मुले बिघडली म्हणून दुसर्याकडे जावून मदत मागण्याऐवजी तुम्हीच कठोर भूमिका घेतली पाहिजे. त्यांना वळण लावलेच पाहिजे. मुलांनी संस्कारी व्हावे असे वाटत असेल तर आधी पालकांनीही स्वत:ला संस्कारीत करावे. आज आपल्या देशात स्वच्छतेच्या संस्कारांची मोठी गरज आहे. त्यासाठी मोठ्यांनीच पुढाकार घेतला तर उद्याचे भविष्य असलेली मुलेही त्याचे अनुकरण करून आपला देश स्वच्छ ठेवतील.
सत्संगाला युवकांचीही गर्दी
कुटुंबाची, समाजाची तसेच देशाची मोठी शक्ती असलेली युवा पिढी या दिव्य सत्संग सोहळ्याला आवर्जून हजेरी लावून राष्ट्रसंत ललितप्रभजी महाराज व राष्ट्रसंत चंद्रप्रभजी महाराज यांच्याकडून संस्कारांची शिकवण आत्मसात करीत आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून मोरया मंगल कार्यालयचे प्रांगण ज्येष्ठांबरोबरच युवकांच्या गर्दीने फुलल्याचे पहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रसंत उपस्थितांशी थेट संवाद साधत नित्य व्यवहारातील अनेक उदाहरणे देत मार्गदर्शन करीत असल्याने त्याचा मोठा प्रभाव पडत असून युवा वर्गही तितक्याच तल्लीनतेने या अध्यात्माच्या जागरात सहभागी होत आहे.