नवाब मलिक यांचे मत : चौथी युवा संसद
पुणे : वाढती लोकसंख्या ही देशासमोर समस्या आहे, असे अनेकदा सांगितले जाते. प्रत्यक्षात लोकसंख्येला दिशा नाही, ही आपली खरी समस्या आहे. जितके हात तेवढे काम, जेवढे काम तेवढा विकास हे तत्व आपण अंमलात आणायला हवे. युवकांना योग्य दिशा देण्याचे काम केले नाही, तर देश कधीच महासत्ता होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. नर्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. संसदेत सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत या विषयावर आयोजित चौथ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी व्याख्याते सुषमा अंधारे, पत्रकार मिलिंद भागवत, डॉ. सुधाकरराव जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते.
सर्वांमध्ये एकी असणे गरजेचे
भारत जगाची सहावी अर्थव्यवस्था बनली असल्याचे वर्तमान सरकार सांगत आहे. अर्थव्यवस्था पाहताना नागरिकांचे दरडोई उत्पन्न किती आहे यावरून अर्थव्यवस्था मोठी की नाही, हे ठरविले जाते. राजकारणात तरुणाईने यायला हवे, परंतु स्वत:साठी नाही, तर दुसर्यासाठी काम करण्याकरीता यावे. सशक्त भारतासाठी सर्वांमध्ये एकी असणे गरजेचे आहे. त्याकरीता देशात मानवतेचा विचार करून काम करायला हवे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. सशक्त भारताकरीता महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले असेल, तरीही प्रत्यक्ष निर्णयक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग नाही. त्यांच्यासोबत असलेले पुरुष हेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे खरच महिलांना आरक्षण मिळाले आहे का, हा प्रश्न कायम आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. मिलिंद भागवत यांनी मनोगत व्यक्त केले.