मुंबई । गड कोटांच्या जीर्णोद्धारासाठी विशेष प्रयत्न करणार्या सह्याद्री प्रतिष्ठानने दुर्ग संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर यांना सह्याद्री विशेष सेवा सन्मान पुरस्कार जाहीर केला असल्याची माहिती दुर्गरक्षक श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली. नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात हुतात्मादिनी म्हणजेच 23 मार्चला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील गड कोटांच्या जीर्णोद्धाराचे मोठे काम आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या या कामाची दखल जागतिक रेकॉर्ड्समध्येही केली गेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण होत असून, आजवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, प्रमोद मांडे, पांडुरंग बलकवडे आदी महान काम करणार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासूनची प्रभावळकरांची चळवळ
दीपक प्रभावळकर यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून हि चळवळ महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांपर्यंत पोहोचवली. शिवरायांचे किल्ले आकाराने प्रचंड मोठ्ठे नसले तरी ते आजही जिवंत आहेत. या किल्ल्यांना गौरवशाली इतिहास असल्यानेच देशभरातील अन्य प्रांतातल्या किल्ल्यांपेक्षा या किल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य, केंद्र शासनासह सामान्य माणसाने कटिबद्ध रहावे अशी प्रभावळकर यांची धारणा आहे व त्यातूनच दुर्ग संवर्धन चळवळ वाढत असल्याचेही ते म्हणाले. याचवेळी अशोक मानकर, डॉ. अमर अडके, डॉ. जि. एस. महाडिक, डॉ. चंद्रकांत कुरणे, मीनल राजहंस, प्रदीप केळकर – चंद्रशेखर भुरांडे, सतीश शं. अनसिंगकर, डॉ. सचिन पवार – रमेश भिवरे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असेही प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
पुरस्कार प्रदान करण्याचे हे दशकपूर्ती वर्ष
पुरस्कार प्रदान करण्याचे हे दशकपूर्ती वर्ष असून यंदा या सोहळ्याचे दिमाखदार नियोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या दुर्गम गड किल्ल्यांवर छत्तीस तासांचा अखंड शिवजागर म्हणजे दुर्ग संमेलन असे आता समस्त महाराष्ट्रात नमूद आहे. दुर्ग संमेलन सारख्या कार्यासह विविध मार्गांमधून किल्ल्यांच्या जहर्णोद्धारासाठी केलेल्या कामाची पावती म्हणूनच यंदाचा प्रथम सह्याद्री विशेष सेवा सन्मान दुर्ग संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर यांना जाहीर करत असल्याचे श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले.