दीपनगरातील लोखंड चोरी ; दोघे आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- दीपनगर सुरक्षा प्रकल्पातील चार लाख 10 हजारांचे लोखंड चोरी प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपये किंमतीचे दोन टन लोखंड जप्त करण्यात आले आहे. या आरोपींना मदत करणारे आणखी आठ ते दहा संशयीत असून त्यात भंगार खरेदी करणार्‍या विक्रेत्यांचाही समावेश असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चोरटे जाळ्यात, अनेक गुन्हे उघडकीस
660 प्रकल्पातील सुरक्षा विभागाचे अधिकारी मुकेश मोतीराम भोळे यांनी शुक्रवारी रात्री दीपनगर प्रकल्पातून 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान रात्री ट्रॅक्टर (एम.एच.27-4891) मधून 10 ते 12 अज्ञात चोरट्यांनी चार लाख 10 हजार रुपये किंमतीचे लोखंड लांबवल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन करेवाड व सहकार्‍यांनी रोशन प्रकाश चौधरी (30, वरणगाव) व पंकज रामचंद्र चौधरी (36, वरणगाव) यांना शनिवारी सायंकाळी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून लाखो रुपये किमतीचे दोन टन लोखंड जप्त करण्यात आले तर या गुन्ह्यात आणखी त्यांचे काही साथीदार असून लवकरच त्यांनाही अटक होईल, असे उपनिरीक्षक करेवाड म्हणाले.