नवी दिल्ली : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीमधील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीपिका- रणवीरचा साखरपुडा झाला. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोड बंदोबस्त असून लग्नविधीचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप समोर आले नाहीत. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा दिमाखदार विवाहसोहळा संपन्न झाला.
Deepika Padukone and Ranveer Singh get married in Italy in a traditional Konkani ceremony. (File pic) pic.twitter.com/DngjBVjfac
— ANI (@ANI) November 14, 2018
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा आहे. कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर उद्या (गुरुवारी) सिंधी पद्धतीने दीपिका- रणवीर विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकानं पाहुण्यांना ठेवली असल्याचं समजत आहे.
मंगळवारी दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आलं होतं. हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात रंगत आणली. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीपिका- रणवीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला निमंत्रण देण्यात आलं आहे.