मुंबई । अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे. आयपीएलदरम्यान सहाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सहाच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआयचे डॉक्टर उपचार करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सहाला विश्रांती मिळावी आणि त्याची दुखापत पूर्ण बरी व्हावी म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणार नाही. ऋद्धीमान सहाऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. 14 जूनपासून बंगळुरूमध्ये या एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
सहा आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळला. कोलकात्याविरुद्धच्या दुसर्या क्वालिफायर मॅचमध्ये सहाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला चेन्नईविरुद्धचा अंतिम सामनाही खेळता आली नाही. याआधी दक्षिण आफ्रिका दौर्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघामध्येही ऋद्धीमान सहाची निवड करण्यात आली होती. पण सेंच्युरिअनमध्ये झालेल्या दुसर्या कसोटी सामन्याआधी सहाच्या मांड्यांच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे सहाऐवजी पार्थिव पटेलला या सामन्यामध्ये संधी देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये पटेलला चकमदार कामगिरी करता आली नव्हती.
दिनेश कार्तिक फॉर्ममध्ये
अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये दिनेश कार्तिकला संधी देण्यात आल्यामुळे 8 वर्षांनंतर त्याचे भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमन झाले आहे. दिनेश कार्तिक 2010 साली बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. 2004 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कार्तिकने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कार्तिकने 23 कसोटी सामन्यामध्ये 1,000 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. निडास ट्रॉफीच्या फायनलमधील वादळी खेळी आणि आयपीएलमध्ये कार्तिकने चांगली कामगिरी केली होती.