जळगाव । शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारातून वकीलाची दुचाकी लांबविणार्या चोरट्यास शहर पोलिसांनी रविवारी सकाळी दाणाबाजार परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याजवळून पोलिसांनी चोरीला गेलेली दुचाकी देखील हस्तगत केली आहे. पिंंप्राळा रस्त्यावरील ढाकेनगर येथील रहिवाशी असलेले अॅड. उमेश आनंदा सनान्से यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच 19 एएफ 5139 ही 27 रोजी दुपारच्या सुमारास न्यायालयाच्या आवारातून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती.
न्यायालयातून लांबविली दुचाकी
याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासधिकारी पोहेकॉ. विजयसिंग पाटील यांनी तात्काळ तपासाला सुरूवात करून न्यायालय आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना चोरटा दिसून आल्यानंतर त्यांनी ते फुटेत ताब्यात घेऊन त्यानुसार तपासाला सुरूवात केली होती. या प्रकरणाचा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंह, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांच्या पथकातील पोहेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील हे दोघं तपास करीत असताना रविवारी सकाळीच चोरटा दाणाबाजारात फिरत असल्याची माहिती विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांना मिळाली. त्यानंतर दोघांनी दाणाबाजार परिसरात सापळा रचून दुचाकी चोरटा गोपाल अशोक चौधरी वय 32 रा. रामेश्वर कॉलनी याला दुचाकी क्रमांक एमएच 19 एएफ 5139 सह ताब्यात घेतले. दरम्यान त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून गुन्ह्याचा तपास पोहेकॉ. प्रितमसिंग पाटील करीत आहे.