Robbed A Pensioner In Bhusawal : Crime Against The Trio भुसावळ : दुचाकीवरून बहिणीकडे निघालेल्या भुसावळातील सेवानिवृत्ताला त्रिकूटाने अडवून लुटण्याची घटना शहरातील अष्टभूजा मंदिराजवळ शुक्रवार, 9 रोजीरात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार राजेश मारोती कोल्हे (47, दुर्गा कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) हे भुसावळ येथून नशिराबादस्थित बहिणीकडे शुक्रवारी रात्री दुचाकी (एम.एच.19 ए.के.8790) ने निघाले असताना जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्ता अडवत कोल्हे यांच्याकडील मोबाईल, पॉवर बँक,आर्मी कार्ड व पाचशे रुपयांची रोकड असा एकूण सात हजार 700 रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पोबारा केला.
बाजारपेठ पोलिसात गुन्हा
घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे आदींनी भेट देत घडला प्रकार जाणून घेतला. कोल्हे यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री आठ वाजता अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.