खडकी : दुचाकीवरुन घरी निघालेल्या बाप-लेकाच्या दुचाकीस मागुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघाताच्या घटनेत वयोवृद्ध बापाचा मृत्यु झाला. अपघात करुन पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी लावला असुन लवकरच त्यास अटक केली जाणार असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली. अपघाताच्या घटनेत मृत्यु पावलेल्या इसमाचे नाव रामफल भिसेसर पाल असे आहे. घटनास्थळावरुन पसार झालेल्या अनोळखी दुचाकीस्वाराच्या नावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शामबाबु पाल (वय 58 रा.सदर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री 11.20 च्या सुमारास शामबाबु हे वडील रामफल यांच्यासोबत दुचाकी वरुन रेंजहिल्स मार्गे राहत्या घरी निघाले होते. एफ टाईप बिल्डींग समोरील रस्त्याने जात असताना अचानकपणे मागुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने पाल यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. मागे बसलेले रामपाल हे खाली पडून गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरुन आरोपीने यावेळी पळ काढला. रुग्णालयात उपचारापुर्वीच रामफल यांचे निधन झाले. पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराच्या नावे गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेतला असता त्याच्या दुचाकीचा नंबर पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्याअनुसार लवकरच पोलीस आरोपीला अटक करणार असल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरिक्षक पी.एस.देवकर यांनी दिली.