दुचाकी अपघात प्रकरणी मयत चालकाविरुद्ध गुन्हा

0

यावल- तालुक्यातील किनगाव-इचखेडा गावादरम्यान 25 जून रोजी दुचाकींची समोरासमोर धडक होवून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या अपघाताच्या घटनेत तिसरे जखमी मुकद्दर तडवी यांच्या फिर्यादीवरुन येथील पोलिस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरणार्‍या मृत दुचाकीस्वार शुभम धनराज शिंदे-पाटील (रा.लोहारा, ता.पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. किनगाव ते इचखेडा रस्त्यावर गेल्या 25 जून रोजी 11 वाजेच्या सुमारास किनगाव येथील शुभम धनराज शिंदे-पाटील हा दुचाकीने इचखेड्याकडे जात होता तर इम्रान अरमान तडवी व मुकद्दर कलींदर तडवी (दोघे रा.इचखेडा) हे दुचाकीने किनगावकडे येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला होवून दुचाकीस्वार तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना जिल्हा समान्य रूग्णालयात उपचार्थ हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान शुभमची प्राणज्योत 26 जूनला मालवली तर इम्रान अरमान तडवी यांचे 27 जूनला उपचारादरम्यान निधन झाले होते. अकस्मात मृत्यूच्या नोंदीत झालेल्या तपासाअंती शनिवारी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत शुभम शिंदेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.