दुचाकी चोराला अटक

0

फरासखाना पोलिसांनी केली 30 वाहने जप्त

पुणे : डॉक्टरांचा पेहराव करून वाहने चोरणार्‍याला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 30 वाहने जप्त केली आहेत. शाहरुख रज्जाक पठाण (वय 22, रा़ पुरंदर) असे त्याचे नाव आहे.

शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या होत्या. वाहन चोराला पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. यादरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी शंकर कुंभार यांना माहिती मिळाली की, शाहरुख पठाण हा दुचाकी चोर्‍या करत आहे. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक किशोर नावंदे, उपनिरीक्षक पाटील, कर्मचारी अमेय रसाळ, केदार आढाव तसेच त्यांच्या पथकाने पठाणला सापळा रचून पकडले. चौकशी केली असता त्याने वाहने चोरल्याचे सांगितले. तपासात फरासखाना परिसरातील 8 गुन्ह्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीचे 25 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात 26 दुचाकी, 3 चारचाकी तसेच एक टेम्पो असा 27 लाख 25 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून वाहने घेतलेल्या व मदत करणार्‍यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.