दुधाचे बील महिलांच्या नावे

0

पुणे । राज्यात दुधाचे उत्पादन वाढत आहे. त्यामुळे यापुढे जनावरांची देखभाल करून दुधव्यवसाय वाढविण्यास मदत करणार्‍या महिलांच्या नावावर दुधाचे बील काढण्यात येईल. महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक डेअरीच्या बीलबुकात महिलांची नावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेमध्ये आयोजित राज्य विकास परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, सचिव डॉ. असीम गुप्ता, राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

हिरवा चारा उपलब्ध करणार
शासनाच्यावतीने शेतकर्‍यांना जागेवर हिरवा चारा उपलब्ध करून दुग्धउत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यात यावेळी चारा छावण्या सुरू करण्यात येणार नसल्याचे जानकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद जनतेच्या विकासाच्या नाड्या आहेत. ग्रामपातळीपासून एकमेकांच्या साथीने काम केल्यास गावांचा विकास साधण्यास मदत होते. त्यासाठी ग्रामसचिवालय ते जिल्हा परिषद प्रशासन यांच्याशी समन्वय साधला पाहिजे. पदाधिकारी आणि प्रशासन अधिकार्‍यांनी कामास प्राधान्य दिल्यास विकास वेगाने होण्यास मदत होईल. दरम्यान, पशुसंवर्धन विभागासाठी राज्य शासनाने तब्बल 650 कोटींचे बजेट मंजूर केले आहे. त्यामुळे पशुसंवर्धनाच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊन दुधउत्पादन, शेळी-मेंढी पालन, उस्मानाबादी शेळ्या पालन उपक्रमास प्राधान्य दिले जाणार आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरणार
राज्यातील विविध पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत कोणत्याही जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभागातील पदे रिक्त राहणार नसल्याची खात्री जानकर यांनी दिली आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीत पशुवैद्यकीय विभागातील विविध पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.