दुधात भेसळ करणाऱ्यांना मोठी शिक्षा!

0

विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची माहिती
राज्यातील भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी कायदयात बदल करण्याची प्रक्रिया राबविणार

मुंबई :- राज्यातील भेसळयुक्त दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने फौजदारी कायदयात बदल करण्यास राज्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार कायदयात बदल करण्याच्या दृष्टीने विधी विभागाकडून कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या कायदयात सहा महिन्यापर्यंत असलेली शिक्षेची मर्यादा कमीत कमी तीन वर्षे तर जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंत करण्याचा विचार होणार आहे. लवकर हा कायदा आणला जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

शिक्षेमध्ये बदल करण्यास राज्य सरकारला परवानगी
राज्यात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याप्रकरणी विधानसभा सदस्य अमित साटम, मनिषा चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री गिरीष बापट म्हणाले की, भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्यासाठी फौजदारी संहिता कलम २७२ ते २७६ पर्यंतमध्ये बदल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र सरकारने कायदयातील कलमांच्या शिक्षेमध्ये बदल करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार विधी विभागाच्या कायदेतज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात येत असून शिक्षेची मर्यादा वाढविण्याच्या त्यातून प्रयत्न केला जाणार आहे. भेसळीच्या संदर्भातील कायदयातील पळवाट रोखण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. दुधासह खादय पदार्थातील भेसळ रोखण्याकरिता प्रयत्न केले जातील. कायदयातील तरतूदी बदलाच्या दृष्टीने राज्यात १४९ ठिकाणी २४ हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविणार
राज्यात खादय पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी लवकरच अन्न सुरक्षा व्यवस्थापन राबविले जाणार आहे. या मध्ये सर्वांचा समावेश केला जाईल. व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देवून त्यांना सुरक्षा ठेवण्याचे तंत्र दिले जाईल.

चार मोबाईल व्हॅनची कामगिरी असमाधानकारक
राज्यात अन्न व औषधी प्रशासनाने दुधासह अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी चार मोबाईल व्हॅन खरेदी केल्या आहेत. परंतु या मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची फारशी समाधानकारक कामगिरी झालेली नाही.त्याबद्दल संबंधितांना समज देण्यात येवून त्यांना नवीन कार्यक्रम आखून दिला जाईल. मुंबईच्या मार्गावरून येणारे दुधाच्या टँकरची तपासणी केली करण्यात येईल. त्यासाठी अधिक कडक बंधने घालण्यात येतील असे मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.यावेळी चर्चेत बाळासाहेब थोरात, सुभाष साबणे, राहूल कुल, अतुल भातखळकर आदींनी भाग घेतला.