दुबईत 9 सप्टेंबरला रंगणार विश्‍व मराठी संमेलनाचा सोहळा

0

पुणे । विश्‍व मराठी परिषदेतर्फे यंदाचे एकदिवसीय विश्‍व मराठी साहित्य संमेलन 9 सप्टेंबरला दुबई येथील अबुधाबी येथे होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन निवृत्त पोलीस महासंचालक सुरेश खोपडे करणार आहेत, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी, भाऊ सुरडकर, राजेंद्र गुंड, चंद्रकांत शहासने, डॉ. शुभा साठे उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेची परवड
भारताचे संरक्षण व अंतर्गत सुरक्षा या विषयावर होणार्‍या संमेलनाचे अध्यक्षस्थान निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले भुषविणार आहेत. मराठी भाषेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढावी, तसेच प्रसार आणि प्रचार व्हावा, मराठी भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावी. यासाठी यंदा दुबईची निवड करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी गोखले म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेची परवड झाली आहे. संरक्षण दलात काम करतानाही मराठी भाषेतील सैनिकांची चांगली मदत होते. परंतु, इतर देशात मराठी पसरल्यास आणखीन मदत होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दुबईत होणार्‍या मराठी संमेलनामुळे दोन्ही देशातील संबंध सुदृढ होतील असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेचे ज्ञान प्रगल्भ व्हावे
देशाची सुरक्षा, सीमेवरील सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि हवाई सुरक्षा यासंबंधी काम करत असलेल्या विविध कंपन्या, त्यांची आयुधे निर्माण करणार्‍या कंपन्या, त्यांचे व्यवहार, संबंधित कायदे, नियम, अधिकार अशा विविध विषयांचा आढावा या संमेलनाच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचे गोखले यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र पोलिसांकडे इतर देशात, राज्यात कोणत्या नजरेने पाहिले जाते, त्यांचा आत्मविश्‍वास, काम करण्याची पद्धत, शैली याचा लेखाजोखा या संमेलनाच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान प्रगल्भ व्हावे, मराठी भाषा लेखनापुरती मर्यादित राहू नये. तसेच मराठी भाषेकडे जोपर्यंत उपजिविका देण्याचे साधन म्हणून पाहिले जात नाही, तोपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.