दुबार पेरणीचे ढग गडद; 35 टक्के पेरण्या धोक्यात!

0

पुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, त्यांच्यावर दुबारपेरणीचे काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत. खरिपासाठी शेतकर्‍यांनी मशागत आणि बी-बियाण्यांसाठी खर्च केलेली रक्कम मातीत जाण्याची शक्यता असून, त्यांना परत एकदा कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. जिल्ह्यात खरिपाच्या 35 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, तर पाऊस नसल्याने उर्वरित पेरण्या रखडलेल्या आहेत. पेरा झालेल्या पिकांसाठी पावसाची गरज असून, पावसाची ओढ कायम राहिल्यास दुबार पेरणीला सामोरे जाताना बळिराजाचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.

आणखी चार दिवस वाट पहावी लागणार
साधारणतः 15 जून ते 15 जुलैदरम्यान खरिपाच्या पेरण्या केल्या जातात. जून महिन्यात 222 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. या काळात खरिप पेरण्यांसाठी वेग आला होता. जुलै महिन्यात 67 टक्के पाऊस झाला आहे. पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. साधारण 15 जुलैपर्यंत खरिपाच्या पेरणीचा हंगाम असतो; परंतु हंगाम संपण्याची वेळ आली तरी पाऊस नसल्याने उगवून आलेली पिके हातची जाण्याची चिन्हे आहेत. येत्या 4 दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकर्‍यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. जिल्ह्यात खरिपासाठी भात, ज्वारी, बाजरी, रागी, मका, तृणधान्य, तसेच तूर, मूग, उडीद व इतर कडधान्ये, भुईमूग, सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. भात आणि ज्वारीची पेरणी सरासरी केवळ आठ टक्के झाली आहे. बाजरी 67 टक्के, रागी 2 टक्के, मका 87 टक्के, तूर 31 टक्के़, मूग 91 टक्के, उडीद 59 टक्के, भुईमूग 31 टक्के इतकी पेरणी झाली आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पावसाची सरासरी (मिमीमध्ये)
तालुका पाऊस
भोर 5.7
मावळ 4.3
वेल्हा 1.8
खेड 0.3
आंबेगाव 0.2
बारामती 4.1
इंदापूर 1.4
एकूण 17.7

खरिपाची पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका पेरणीक्षेत्र
हवेली 6,356
मुळशी 9,307
भोर 14,674
मावळ 11,937
वेल्हा 5,941
जुन्नर 31,873
खेड 24,527
आंबेगाव 17,880
शिरुर 36,250
बारामती 13,299,
इंदापूर 9,788
दौंड 7,208
पुरंदर 23,677

जिल्ह्यातील धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
टेमघर 0.38, वसरगाव 2.18, विसापूर 0.01, कासारसाई 0.30, वडिवळे 0.34, येडगाव 0.41, वडज 0.51, गुंजवणी 0.96, वीर 1.37, कळमोडी 1.51, माणिकडोह 1.69, आंध्रा 2.13, चासकमान 2.58, भामाआसखेड 2.85, नीरादेवघर 2.94, डिंभे 3.20, पवना 3.76, भाटघर 5.12, मुळशी 5.58.