दुय्यम निबंधकासह खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

दस्त नोंदणीसाठी 300 रुपयांची लाच पडली महाग : धुळे एसीबीची कारवाई

धुळे : दस्त नोंदणीसाठी 300 रुपयांची लाच मागणी शिरपूर दुय्यम निबंधकांसह खाजगी पंटराच्या अंगलट आली असून लाच स्वीकारताच धुळे एसीबीच्या पथकाने आरोपींना कार्यालयातून अटक केली. गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे (54, रा.जत्रा हॉटेलजवळ, कोणार्क नगर मनोमय ड्रीम होम, नाशिक) व खाजगी पंटर सुनील उर्फ छोटु पंडित बाविस्कर (43, रा.प्लॉट नंबर 1, बस स्टँड जवळ वाघाडी, ता.शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

वकीलाकडेच मागितली लाच
40 वर्षीय तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्याकडील पक्षकाराच्या खरेदीखताची रि2जस्टर नोंदणी करावयाची असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तुर या नात्याने नोंदणीकरीता गेले असता दुय्यम निबंधक यांच्या सांगण्यावरून खाजगी पंटराने दस्त नोंदणीच्या बदल्यात 17 रोजी 400 रुपयांची लाच मागितली मात्र 300 रुपयात तडजोड झाल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार करण्यात आली. आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, संदीप सरग, भूषण खलाणेकर, भूषण शेटे आदींनी यशस्वी केला.