दुरांतो एक्स्प्रेसवरील दरोड्याचा उलगडा : भुसावळातील दोघे आरोपी जाळ्यात

0

आंतरराज्यीय टोळीचे राज्यभरात कारनामे : लुटीचे सुरत कनेक्शन : रेल्वे सुरक्षा बलाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या

भुसावळ (गणेश वाघ)- पाचोरा तालुक्यातील माहिजी ते म्हसावद स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड अप 12290 नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजेदरम्यान घडली होती. या घटनेत लाखो रुपयांचा प्रवाशांचा मुद्देमाल चोरीस गेला होता तर चोरट्यांना पकडण्याचे आवाहन सुरक्षा यंत्रणेपुढे निर्माण होते. रेल्वे सुरक्षा बलाने चोरट्यांना पकडण्यासाठी ‘अंबूस’टीम कार्यरत केली होती तर गुरुवारी मध्यरात्री भुसावळ रेल्वे यार्डात अप क्रांती एक्स्प्रेसमधून मोबाईल चोरी करून आरोपी पळत असताना रेल्वे सुरक्षा बलाने लावलेल्या जाळ्यात दोन आरोपी अडकले व त्यांनी राज्यभरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत दुरांतोतही टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली. विशेष म्हणजे या दरोड्यात सुरतमधील गुन्हेगारांचा सहभाग असून या टोळीत आठ ते दहा आरोपी असल्याचे सूत्रांनी सांगितले. शाकीर सैय्यद रशी सैय्यद उर्फ गोलू (21, भुसावळ) व शेख जहेउद्दीन शेख सलीमुद्दीन (20, रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना रेल्वे न्यायालयाने पाच दिवसांची आरपीएफ कोठडी सुनावली.

‘अंबूस’ टीमच्या सापळ्यात अडकले आरोपी
दुरांतोवरील दरोड्यानंतर रेल्वे गाड्यांमध्ये गस्त वाढवण्यात आली होती तर साध्या वेशातील कर्मचारी (अंबूस) टीम अ‍ॅक्टीवेट करण्यात आली होती. गुरुवारी रात्री 1.20 वाजेच्या सुमारास रेल्वे यार्डात अपर 12630 निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस आल्यानंतर गाडीला सिग्नल नसल्याने ती थांबली असताना दोघा आरोपींनी एका डब्यातून 60 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबवून पोबारा केला तर अंधारात सापळा लावून बसलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

राज्यभरात आरोपींचे कारनामे
अटकेतील आरोपींनी पाचोर्‍याजवळील दुरांतो एक्स्प्रेसवर टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली आहे. आरोपींनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या हा गुन्हा केला तर काही संशयीत दुरांतो भुसावळपासून बसले असल्याचीदेखील माहिती आहे शिवाय या गुन्ह्यात आरोपींनी सुरत येथील गुन्हेगारांची मदत घेतल्याची कबुली दिली. माहिजीजवळ रेल्वे यंत्रणेत छेडछाड केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी राज्यभरात अनेक चोर्‍यांसह दरोडे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या गुन्ह्यातही त्यांना अटक केली जाणार आहे.

यांच्या कारवाईला आले यश
रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी.एस.यादव, उपनिरीक्षक ए.पी.यादव, प्रधान आरक्षक मिलिंद तायडे, आरक्षक विनोद जेठवे, प्रधान आरक्षक सतीश चौहाण आदींनी ही कारवाई केली.