स्वरानंदवनला मोहम्मद रफी पुरस्कार प्रदान
पुणे : सत्यम शिवम् सुंदरम…लग जा गले…बेखुदी मे सनम… यांसारख्या मोहम्मद रफी यांच्या एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण करून दृष्टीहिन, मूकबधिर आणि कुष्ठरोगी कलाकारांनी पुणेकरांची मने जिंकली. चंद्रपूरसारख्या अतिदुर्गम भागातील या विशेष रत्नांना स्वरानंदवनच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी एकत्र केले आणि शिक्षण, प्रशिक्षण व पुर्नवसनाच्या माध्यमातून त्यांना स्वत: च्या पायावर उभे केले. या विशेष रत्नांनी पुणेकरांसमोर गीतांचे सादरीकरण करताच अनेकांना टाळ्यांनी दाद दिली, तर त्यांचे असामान्य कर्तृत्व पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
प्रख्यात गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त मोहम्मद रफी आर्टस् फाऊंडेशनच्या वतीने मोहम्मद रफी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, बार्टीचे कैलासकुमार कणसे, ज्येष्ठ कलाकार जयमाला इनामदार, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, मुख्य आयोजक इक्बाल दरबार, डॉ.मिलींद भोई, शिरीष मोहिते, अॅड.प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. विकास आमटे यांच्या स्वरानंदवन वाद्यवृंदाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, 51 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते.