दुर्गाडीला मिळणार पुनर्वैभव

0

कल्याण : शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्‍या कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बुरुज ढासळू लागल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण होते. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध झाली असली तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान ढासळलेला भाग कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी हा भाग हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे.

कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यातच गेल्या महिनाभराच्या कालावधीत किल्ल्याचा बुरुज ढासळू लागल्याची घटना घडल्याने शिवकालीन ऐवज असलेल्या या किल्ल्याच्या डागडुजीची मागणी जोर धरू लागली होती. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा देत शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्‍या या दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्तीची मागणी केली. तर मनसेनेही आक्रमक भुमिका घेतली होती.

तटबंदीची पाहणी
कल्याण तहसीलदार आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या किल्ल्याच्या ढासळलेल्या भागाची पाहणी करून अहवाल तातडीने पाठविण्याचे तसेच डागडुजीकडे लक्ष देण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानंतर संबधित विभागाने रायगड किल्ल्याच्या डागडुजीसाठी काम करणार्‍या आर्किटेक्टच्या मदतीने या किल्ल्याच्या तटबंदीची पाहणी केली असता या किल्ल्याचे जुने बुरुज सुरक्षित असून या बुरुजावर पालिका प्रशासनाने 90 च्या दशकात केलेल्या डागडुजीनंतर सौंदर्यीकरणातून उभारलेल्या बुरुजाच्या भिंती ढासळल्याचा निष्कर्ष काढला असून यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका नसल्याचा अहवाल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिनाभराचा कालावधी
राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिल्यानंतर तटबंदीसह किल्ल्यावरील मंदिर परिसराच्या डागडुजीसाठी 4 कोटी रुपयाच्या निधीचा प्रस्ताव संबधित विभागाने तयार केला आहे. यातील 1 कोटी 89 लाख रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झाले आहेत. या निधीतून करावयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

मलबा हटवण्याचे काम सुरु
ढासळलेल्या बुरुजाच्या भिंती कोसळून अपघात होऊ नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे ढासळलेल्या बुरुजाचा मलबा हटविण्याचे काम सुरु केले आहे. महिनाभरात डागडूजीला सुरुवात केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या कामास सुरुवात केल्यामुळे सभागृह नेते राजेश मोरे यांनी शासनाचे आभार मानले. मात्र या घटना वारंवार घडत असल्याने शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे शासनाकडून कामे होणार नसतील तर देखभाल दुरुस्ती महापालिकेकडे द्यावी आम्ही ती करू अशी मागणी केली होती.

पाठपुराव्याला यश
ऐतिहासिक कल्याण शहराच्या पाऊलखुणा जपण्यासाठी शासनाच्या पर्यटन विकास महामंडळ आणि पुरातत्वीय विभागाकडे विशेष पाठपुरावा करण्यात आला. याचाच भाग म्हणून ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडून 4 कोटी 29 लक्ष रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यातील सुमारे 1 कोटी 29 लक्ष रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. यामध्ये तातडीने निधीच्या प्रत्यक्ष कामाबाबतची निविदा प्रक्रिया आणि समंत्रक नेमणूक आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून काम सुरु करण्यात येणार आहे.