कल्याण । बकरी ईद दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात मुस्लीम बांधव सकाळीच नमाज पडतात. यामुळे या काळात हिंदूना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरात घंटानाद व आरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कल्याणातील दुर्गाडी हे हिंदूचे पवित्र देवस्थान असून या काळात मंदिरात पूजा आणि आरती करण्यास बंदी घालून हिंदुच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे हा बंदी हुकूम मोडून काढण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो शिवसैनिकांनी भगवा ध्वज हातात घेऊन दुर्गाडीवर चाल केली. मात्र पोलिसांनी या शिवसैनिकांना लालचौकी येथेच रोखून धरले. ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी शनिवारी सकाळी 7 वाजता नमाज पडून झाल्यानंतर जागे झालेल्या शिवसैनिकांनी 7.30 वाजता घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाच्यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
बंदी हुकून मोडून शिवसैनिकांचे दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क प्रस्थापित केले आहेत. बकरी ईदनिमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरिता बंदी घालण्यात येते. याचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्हाप्रमुख कै. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हे आंदोलन छेडले जाते. या दिवशी हा बंदी हुकूम मोडण्यासाठी हजारो शिवसैनिक दुर्गाडीवर चाल करतात.
दुर्गाडी किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त
यावर्षीही पोलिसांनी बंदी हुकूम जारी केला असल्याने शनिवारी सकाळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी, कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महिला आघाडीप्रमुख विजया पोटे, नगरसेविका छाया वाघमारे, रवींद्र कपोते, माजी नगरसेवक अरविंद पोटे, उप तालुकाप्रमुख दीपक सोनाळकर, यांच्यासह शेकडो शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक शेकडोच्या संख्येने हातात भगवा ध्वज घेऊन दुर्गाडीवर दर्शनासाठी निघाले. यावेळी दुर्गाडी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
शिवसैनिकांना अटक
आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना लालचौकी येथील रस्त्यावरच बॅरिकेटस लावून रोखून धरले. दुगाडीवर प्रवेश बंदी केल्यामुळे या शिवसैनिकांनी लालचौकी येथेच आरती केल्यानंतर या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक करत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.