मुंबई । दुर्गामाता, बंड्या मारुती, ओम् ज्ञानदीप, विजय नवनाथ मंडळाने जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या दुसर्या फेरीत स्थान मिळवले. प्रभादेवी, राजाराम साळवी उद्यानातील निलेश सहदेव राऊत क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमारांच्या पहिल्या सामन्यात परळच्या दुर्गामाता संघाने काळाचौकीच्या साईराज संघाचा 39-23असा पाडाव केला. मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेला हा सामनानंतर मात्र काहीसा एकतर्फी झाला. मध्यांतराला दुर्गामाता संघाकडे 18-15 अशी आघाडी होती. उत्तरार्धात दुर्गामाता संघाच्या प्रथमेश पालांडे, अमित माने, आशिष पाले यांनी टॉप गीअर टाकत हा सामना एकतर्फी केला. आशिष पालेने आपल्या एकाच चढाईत तीन गडी टिपले. साईराज संघाच्या ओमकार भोसले, विशाल शिंदे यांनी मध्यांतरापर्यंत दिलेली लढत नंतर मात्र फिकी पडली. दुसर्या सामन्यात बंड्या मारुती संघाने लोअर परेलच्या यंग विजय संघाचा 40-13असा फडशा पाडला.
मध्यांतराला 17-07 अशी आघाडी घेणार्या बंड्या मारुती संघाने उत्तरार्धातदेखील जोरदार खेळ करीत मोठ्या गुण फरकाने हा विजय मिळविला. शुभम पाटीलला या विजयाचे श्रेय जाते. पराभूत संघाचा सौरभ पोखरे बरा खेळला. प्रभादेवीच्या ओम् ज्ञानदीप संघाने दादरच्या शिवनेरी संघाला 39-30असे नमवत आगेकूच केली. संकेत शिंदे, प्रीतम गुरव यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर 22-08अशी भक्कम आघाडी घेणार्या ओम् ज्ञानदीप संघाला उत्तरार्धात मात्र शिवनेरी संघाने कडवी लढत दिली. शिवनेरी संगाच्या ओमकार साळुंखे, प्रलय परब यांनी झंजावती खेळ करीत ओम् ज्ञानदीप संघाला जेरीस आणले, पण संघाला विजयी करण्यात मात्र ते कमी पडले. लोअर परेलच्या विजय नवनाथ संघाने प्रभादेवीच्या गणेशकृपा संघाचा 36- 20 असा पराभव केला. मध्यांतराला विजय नवनाथ संघाकडे 26-07अशी आघाडी होती. मयूरेश पांचाळ, राज लाड विजय नवनाथ कडून, तर प्रथमेश पाटील गणेशकृपा संघाकडून उत्कृष्ट खेळले.