दुर्मीळ वारकरीसह छोटा शराटी, घोंगी, खंड्या आढळला

0

पक्षी निरीक्षण ; पक्षी गणनेत 127 प्रजाती व 32 अतिशय दुर्मिळ पक्षी

खिर्डी (सादिक पिंजारी)- हतनूर धरण व परीसरात नुकत्याच झालेल्या पक्षी गणननेत दुर्मीळ वारकरीसह छोटा शराटी, घोंगी, खंड्यासह दुर्मीळ प्रजातीचे 32 पक्षी तर एकूण 127 प्रजाती आढळल्या. जैवविविधेमुळे (आय.बी.ए.) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त परीरसरात हिवाळ्यात युरोप, सैबेरीया, रशिया, मंगोलिया, चीन, उत्तर भारत या भागातून स्थलांतर करुन येणार्‍या पक्षांची संख्या मोठ्या संख्येने दिसून आली. चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे येथे तीन दिवस पक्षी निरीक्षण करण्यात आले.

भारतातील पक्षी अभ्यासकांचा सहभाग
सुरुवातीला भारतीय पक्षी विश्व जागतिक स्तराला पोहचविणारे पक्षी शास्रज्ञ डॉ.सलीम अली यांना अभिवादन करण्यात आले. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर हभप सारंगधर महाराज, नरेंद्र नारखेडे, अनिल शेठ, मेहुण सरपंच राजेंद्र चौधरी. व सर्व सहभागी पक्षी मित्र उपस्थित होते. गेल्या सहा वर्षांपासुन येथील पक्षांचे निरीक्षण व अभ्यास चातक संस्थेतर्फे सातत्याने केला जात आहे. गतवर्षा प्रमाणे यंदाही निसर्ग संवर्धन संस्थेने हतनूर धरण परीसरातील यज्ञेश्वर आश्रम चिंचोल या ठिकाणी तीन दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन केले. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात, नागपूर, जळगाव, वर्धा, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश आदी ठिकाणांहून संपुर्ण भारतातील 30 पेक्षा जास्त पक्षी अभ्यासक सहभागी झाले.

पक्ष्यांच्या दुर्मीळ प्रजाती आढळल्या
तांदलवाडी, हतनूर, मानेगांव, मुक्ताईनगर परीसरात नदीपात्रात बोटीमध्ये भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेरासारख्या विविध उपकरणांच्या सहाय्याने पक्षांचा अभ्यास केला. हतनूर धरण परीरसरात पक्षी अभ्यासकांना पक्षी वैविध्याची माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, लालसरी, थापाट्या, शेंडी बदक, नदीसुराय, छोटा शराटी, कृष्ण थिरथिरा, घोंगी, खंड्या, चातक व कलहंस यांसारख्या दुर्मिळ प्रजातींसह या ठिकाणी पक्ष्यांच्या 127 प्रजाती आढळून आल्या. चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, उपाध्यक्ष शिवाजी जवरे, सचिव उदय चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, अंकित पाटील, दिनेश पाटील, प्रशांत पाटील, विठ्ठल भरगडे, राजपालसिंग राजपूत, सत्यपालसिंग राजपूत, विलास महाजन, अतुल चौधरी, सुरेश ठाकुर, संजय पाटील, समीर नेवे आदी सदस्य पक्षीप्रेमी व पक्षी अभ्यासक उपस्थित होते.

शासन दरबारी व्हावी नोंद
जळगाव जिल्ह्यातील पक्षी वैभव असलेल्या हतनूर जलाशयावरील पक्षी व जैववैविधतेची नोंद शासन दरबारी व्हावी तसेच सर्व महाराष्ट्रासह भारतभर व्हावे, असे चातकचे सचिव उदच चौधरी म्हणाले.

दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन
हतनूर जलाशयवर अतिशय दुर्मिळ पक्षी पाहायला मिळाले. कलहंस यासारखे पक्षी व जैवविविधतेने श्रीमंत असलेल्या जलाशयवरील जैव विविधता टिकवणे गरजेचे आहे. चातक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे पक्षी निरीक्षक प्रदीप काकडे (मुंबई) म्हणाले.