दुषित पाणी उघड्यावर सोडणार्‍या कंपन्यांवर होणार कारवाई

0

दौंड । दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे रासायनिक पाणी उघड्यावर सोडले जात असल्याने हे पाणी वनविभागच्या हद्दीत जावून जमिनीत मुरत आहे. यामुळे उद्भवणार्‍या प्रदूषणाच्या समस्या परिसरातील नागरी वस्तींनाही भेडसावत आहेत. रासायनिक दुषित सांडपाणी कंपनीच्या आवारात सोडले जात असल्याने याचा फटका आता वनविभागालाही बसू लागला आहे. काळसर, उग्र दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट वनविभागाच्या हद्दीत सोडले जात असल्याने वन्यजीव प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळेच वनविभाग अधिकार्‍यांनी येथील पाण्याचे नमुने घेतले असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर संबंधीत कंपन्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

केमिकल्स झोन म्हणून ओळख
दौंड तालुक्यात पुणे-सोलापूर महामार्गालगत कुरकुंभ परिसरात 1993 मध्ये औद्योगिक वसाहत स्थापनेसाठी कुरकुंभ, पांढरेवाडी या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. कुरकुंभ औद्योगिक वसाहत ही केमिकल्स झोन म्हणून ओळखली जाते. हे क्षेत्र प्रदूषणासाठी बहुचर्चित असताना वसाहतीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत या प्रदूषणाला आळा बसलेला नाही.

ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका
उन्हाच्या तिव्रतेने पाणीसाठे कमी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकत असताना ते वनक्षेत्राच्या हद्दीलगत असलेल्या कंपन्यांच्या दिशेने येतात, अशावेळी प्राणी दिसेल ते पाणी पिणतात. जल तसेच वायू प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असताना, अशा प्रकारचे दुषित सांडपाणी जमिनीमध्ये झिरपून ते थेट वनविभागाच्या हद्दीत पाजरत असल्याने येथील वन्य प्राणी रसायन मिश्रीत पाणी पित आहेत, यातून वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोकाही आहे.