दुष्काळाच्या मागणीसाठी घोषणाबाजी

0

सोनगीर । पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे तरी येथे व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दोनदाच हलका पाऊस झाला. भयावह दुष्काळ असूनही जाहीर केले जात नाही. पिक विमा काढला असूनही कंपनीतर्फे पीक परिस्थिती पहाणी केली जात नाही म्हणून येथील शेतकर्‍यांनी दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे व पीक विमा मंजूर झाला पाहिजे अशा घोषणा देत निर्दशने केली . कृषी विभागाने सोनगीर मंडळ अंतर्गत खरीप पिकांची स्थितीची यापूर्वीच पहाणी केली. त्यावेळी सर्व पिके नष्ट झाल्याचे व आता पाऊस पडून ही पिके येण्याची शक्यता मावळली असल्याचे सांगितले. मात्र तरीही विमा कंपनीने पीक पहाणी न केल्याने नाराज शेतकर्‍यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणा दिल्या.

उडीद पीक पाहण्यासाठी आल्याने गोंधळ
मंडल कृषी अधिकारी पाटील यांनी पीक पहाणी करण्यासाठी रिलायन्सच्या विमा कंपनीचे अधिकारी येत असून मंडळातील शेतकर्‍यांनी जमावे अशा सुचना कृषी विभागातील कनिष्ठ अधिकारींना दिल्या. मात्र रिलायन्सचे अधिकारी आले पण पीक पहाणी करण्यासाठी नव्हे तर उडद पीकाचे प्लॉट पहाण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळअंतर्गत उडदाचे केवळ दोनच प्लॉट आहेत. पीक पहाणी होणार नसल्याचे स्पष्ट होताच जमलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी पीक पहाणी झालीच पाहिजे असा आग्रह धरला. शेवटी घोषणाबाजी केली. पीक पहाणीच्यानिमित्ताने उपस्थित कृषी सहाय्यक (देवभाने) के.एस.खैरनार, सोनगीरचे व्ही.जी.पाटकर, नंदाणेचे एस. डी. भदाणे, रिलायन्स कंपनीचे वाय. व्ही. अवघडे, डी. पी. महाजन यांनी संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढली. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष आर.के.माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी प्रभूदास गुजर, दिनेश बडगुजर, एस. एस. पाटील, मनोहर गुजर, यादव माळी, राजूलाल माळी, गिरीश गुजर, सुभाष गुजर, प्रकाश गुजर, मोहन परदेशी, गोपाल माळी, हेमंत माळी आदी उपस्थित होते.

परिसरात 20 टक्के पाऊस
येथे गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. परिसरातील सर्व तलाव, धरण, विहिरी कोरडे पडले आहे. पावसाच्या उरल्या सुरल्याअपेक्षा देखील नष्ट झाल्या आहेत. सोनगीर कृषी मंडळ विभागांतर्गत सोनगीरसह दापुरा, दापुरी, धनूर, सरवड, कापडणे आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात सरासरी 20 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या महिन्यात मंडल कृषी अधिकारी पी. ए. पाटील, कृषी सहाय्यक एस. डी. भदाणे, व्ही. जी. पाटकर यांनी केलेल्या पहाणीनुसार कापूस, भुईमूग, ज्वारी, बाजरी तसेच फळबागेतील आवळा, बोर आदींचे उत्पादन येण्याची शक्यता मावळली असल्याचे त्यांनी सांगितले.