15 हजार शेतकर्यांना अनुदानाचे वाटप ; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
रावेर- तालुक्यातील 36 हजारपैकी 15 हजार शेतकर्यांना अॅक्सीस बँकेतर्फे दुष्काळी अनुदान अदा झाले असलेतरी अनेक शेतकर्यांना दुष्काळी अनुदान वाटपात दिरंगाई झाल्याने रावेर तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार हरिभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या पत्रामुळे महसूल प्रशासनाने खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
28 कोटी 35 लाखांचा निधी प्राप्त
रावेर तालुक्यातील शेतकर्यांना प्रतिहेक्टरी सहा हजार 800 रुपये दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळणार असून रावेर तहसीलदारांकडे दोन महिन्यापासून 28 कोटी 35 लाख 45 हजार 215 रुपयांचा निधी आला आहे. त्यातील 23 कोटी 12 लाख 78़हजार रुपयांचा निधी बँकेकडे वर्ग झाला आहे. हा निधी शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी महसूल यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे तर शेतकर्यांना अनुदानाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्यामुळे तहसीलदार व संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, पाच दिवसात दुष्काळी अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी आमदार जावळे यांनी केली आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरून आता काय हालचाली होतात, याकडे रावेर तालुक्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.