विभागीय आयुक्तालयाकडून टंचाई कृती आराखडा; पुणे विभागातील 11 हजार 401 गावे आणि वाड्यांमध्ये टंचाईची स्थिती
पुणे : पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळीस्थिती असल्याने रब्बीची कामे घटली आहेत. त्यामुळे रोजगार हमीकडे ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. नोव्हेंबर महिना अखेरीसच पुणे विभागात 1 हजार 876 कामे सुरू झाली आहेत. त्यावर 31 हजार 141 मजुरांना काम मिळाले आहे. पुणे विभागातील 11 हजार 401 गावे आणि वाड्यांचा टंचाई आराखडाही विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगरी भाग वगळता बारामती आणि शिरूरसारख्या तालुक्यातही टंचाई स्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुणे विभागाचा 131 कोटी 46 लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने सोमवारी जाहीर केला. त्यात पाणी पुरवठा आणि पाणी गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्यात आला आहे. केवळ पाणी पुरवठ्यासाठीच 70 कोटी 76 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नळ दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर 417 कामे सुरू
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर 417 कामे सुरू असून, त्यावर 1,767 मजूर काम करीत आहे. तर, इतर कामांची संख्या 82 असून, मजुरांची संख्या 588 आहे. अशी 499 कामे सुरू असून, मजुरांची संख्या 2 हजार 355 आहे. पुणे विभागात ग्रामपंचायत स्तरावर 1 हजार 447 कामे सुरू असून, त्यावर 22 हजार 728 मजूर काम करीत आहेत. तर, इतर ठिकाणी 429 कामे सुरू आहेत. त्यावर 8 हजार 413 मजूर कामास आहेत.
टँकरने पाणीपुरवठ्यासाठी 71 कोटी
पुणे विभागातील टंचाई निवारणासाठी 516 गावे व 1782 वाड्यांमध्ये 2446 नवीन इंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी 12 कोटी 47 लाख 99 हजार रुपयांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 532 कोटी, नळ योजना दुरुस्ती 25 कोटी 2 लाख 29 हजार, तात्पुरत्या नळ योजना 7 कोटी 77 लाख, टँकरने पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटी 96 लाख 92 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विहिरींच्या अधिग्रहणासाठी 9 कोटी 39 लाख 36 हजार तर विहिरींतील गाळ काढण्यासाठी 4 कोटी 20 लाखांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे.
बारामती, शिरूर तालुक्यातही टंचाई
नोव्हेंबर महिना अखेरीसच पुणे विभागात 1 हजार 876 कामे सुरू झाली असून, तब्बल 31 हजार 141 हाताला काम मिळाले आहे. राज्य सरकारने दुष्काळसदृश्य स्थिती असलेले तसेच मध्यम आणि तीव्रतेच्या निकषानुसार दुष्काळग्रस्त वाड्या आणि गावे जाहीर केली आहेत. त्यानुसार पुणे विभागातील 11 हजार 401 गावे आणि वाड्यांचा टंचाई आराखडाही विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगरी भाग वगळता बारामती आणि शिरूरसारख्या तालुक्यातही टंचाई आहे.
जून 2019पर्यंतचा टंचाई आराखडा
पाऊस पेरणी कमी झाल्याने भविष्यात टँकरच्या मागणीत वाढ होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जून 2019पर्यंतचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, विहीरींचे अधिग्रहण, उपसा सिंचन योजनेची वीज बिले भरणे अशा विविध विषयांवर कृती आराखड्यात विचार करण्यात आला आहे.