पाचोरा। तालुक्यातील दुसखेडा गावाजवळ हिवरा नदीवर कोल्हापुर पद्धतीचा बंधारा बांधण्यास नुकतीच प्रशासकिय मान्यता मिळाली असुन या परीसरातील सुमारे 125 एकर जमिन या बंधार्यामुळे ओलिताखाली येणार आहे. 87 लाख रुपयांच्या या योजनेस मंजुरीसाठी आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असुन परीसरातील शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बंधार्याची पाहणी करून केला पाठपुरावा
पाचोरा तालुक्यातील दुसखेडा व परधाडे गावालगत हिवरा नदीवर 15-20 वर्षांपुर्वी या भागात बांधण्यात आलेला बंधारा जिर्ण झाला होता. त्यामूळे या भागात सिंचनाचा प्रश्न शेतकर्यांना नेहमी भेडसवत असे. परिसरातील शेतकर्यांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. आमदार पाटील यांनी त्या परिसराची पाहणी करुन शेती सिंचनाला प्राधान्य देत कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासन दरबारी सादर केला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून विषयाकडे लक्ष देत 6 जुलै रोजी 87 लाख 46 हजार 520 रुपयांची प्रशासकिय मान्यता या योजनेस मंजुर केली. या योजनेमुळे परधाडे, दुसखेडा या दोन्ही गावांच्या परीसरातिल 47 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या बंधार्याची क्षमता 138.78 संघमी असुन या बंधार्यास मिळालेल्या प्रशासकिय मान्यता मिळाल्याची माहिती पत्रकार परीषदेत दिली.