पुणे/पिंपरी-चिंचवड : सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचा संचालक एम. एन. नवले याच्या घरी आणि सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयांवर शुक्रवारी सीबीआयने छापे मारल्यानंतर या छाप्यातून मोठे घबाड सीबीआयच्या हाती लागल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. शनिवारीही हे छापेसत्र व तपासणी मोहीम जोरात सुरू होती. सीबीआयच्या अधिकार्यांनी सरकारची फसवणूक व नुकसानप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक ए. जी. सावंत व वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, या दोघांच्याही घरी छापे टाकले. या छाप्यांतही मोठे घबाड हाती लागल्याची माहिती सूत्राने दिली. याच बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नाशिक व मुंबई येथील घरीही सीबीआयच्या अधिकार्यांनी छापे टाकून महत्त्वाचे दस्तावेज व इतर साहित्य ताब्यात घेतले असल्याची माहितीही सूत्राने दिली. या सर्व प्रकरणांत बँकेच्या अधिकार्यांसह नवले याने बँक व सरकारला सुमारे 58 कोटी रुपयांचा चुना लावला असल्याची माहितीही तपास सूत्राने दिली.
तारणासाठी बोगस कागदपत्रे दिली!
सिंहगड एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मारुती नवले याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे दंतविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी कर्ज मागितले होते. त्यासाठी त्याने काही तारण कागदपत्रेही दिलीत. ही सर्व कागदपत्रे बनावट होती. बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक ए. जी. सावंत व वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर पेडणेकर यांनी या कागदपत्रांची कोणतीही खातरजमा न करता, नवले याला 81 कोटी रुपयांचे कर्ज दिले. तसेच, या सर्व आरोपींनी हातमिळवणी करून इतर बँकांनी दिलेले 21 कोटी रुपयांचे कर्जही टेकओव्हर करून दिले. नवले याने दंत महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत तर बांधलीच नाही; परंतु मिळालेल्या कर्जाचा पैसा इतरत्र वापरला. दिलेल्या कर्जाचा योग्य विनियोग होतो किंवा नाही, याचीही खातरजमा सेंट्रल बँकेच्या या वरिष्ठ अधिकार्यांनी केली नाही. त्यामुळे बँकेला पर्यायाने सरकारला सुमारे 58 कोटी रुपयांचा चुना लागला. त्याप्रकरणी सीबीआयने बँकेच्या सावंत व पेडणेकर या अधिकार्यांना फसवणूक व सरकारी नुकसानप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहे.
सीबीआयच्या धडक कारवाईने बँकिंगक्षेत्रात खळबळ
नवले, सावंत व पेडणेकर या आरोपींनी बँकेच्या पैशाचे काय केले? याबाबत सीबीआय कसून चौकशी करत आहे. नवले याच्या घरी, त्याच्या विविध ठिकाणांच्या कार्यालयांवर सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी दोन दिवसांपासून छापेसत्र सुरू केले आहे. या छाप्यांत अनेक धक्कादायक माहिती सीबीआयच्या हाती आली आहे. शनिवारी सीबीआयने सावंत व पेडणेकर यांच्या घरीही छापे मारलेत. त्या छाप्यांतही मोठे घबाड सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती सूत्राने दिली. सीबीआयच्या या कारवाईने बँकिंग क्षेत्रातील मोठा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम द्यावी लागते. सीबीआय संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहाराची तपासणी करत असून, त्यातून नवले याचा भंडाफोड होईल, अशी माहितीही सूत्राने दिली.
नवलेच्या लोणावळा येथील गेस्ट हाऊसवरही छापा
बँकेच्या अधिकार्यांवर व सिंहगड संस्थेने 75 कोटी रुपयांची अफराफतर केल्याने याची महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यासाठी सीबीआयने छापेमारी सुरू केली. यामध्ये शुक्रवारी मारूती नवले याचे वडगाव येथील निवासस्थान, एनडीए रस्त्यावरील फार्म हाऊस, एरंडवणा येथील कॉर्पोरेट कार्यालय, वडगाव, नर्हे, लोणावळा, वारजे, कोंढवा येथील शिक्षण संस्था, लोणवळा येथील गेस्ट हाऊस आणि सावंत यांच्या नााशिक येथील तर पेडणेकर यांच्या मुंबई येथील घरावर एकाच वेळी छापेमारी केली. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये सीबीआयचे अनेक पथके नेमण्यात आले होते. ही मोठी कारवाई आहे, असे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.