बंगळुरू । कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच अफगाणिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगलेल्या या एकमेव कसोटी सामन्यात भारताने दुसर्याच दिवशी एक डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात दुसर्या दिवशी भारताचा डाव 474 धावांवर आटोपला. यानंतर भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची पळताभुई झाली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांच्या मार्यासमोर अफगाणिस्तान संघ अवघ्या 109 धावांमध्ये माघारी परतला. अफगाणिस्तानचा एकाही फलंदाज भारतीय मार्यासमोर टिकाव लागला नाही. मोहम्मद नाबीचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. नाबीने 24 धावा केल्या. पहिल्या डावात अफगाणिस्तानचा संघ 365 धावांनी पिछाडीवर पडल्यामुळे, भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसर्यांदा फलंदाजीला आल्यावरही अफगाणिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतण्याचे सत्र सुरूच राहिले. 103 धावांवर अफगाणिस्तानचा संघ ऑल आऊट झाला. तत्पूर्वी, भारतीय संघाने 347/6 धावांपासून पुढे खेळायला दुसर्या दिवशी सुरुवात केली. हार्दिक पंड्याने 76 धावांची खेळी करत भारताचा डाव 474 धावांवर नेला. त्याला तळातील फलंदाजांची चांगली साथ लाभली.
राशीदसह खेळल्याचा फायदा
एम. चिन्नास्वामी मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीवर धवनने चांगलाच हल्ला चढवला. आयपीएल नेट प्रॅक्टिसमध्ये अनेकवेळा राशिदसोबत खेळलो होतो. त्यामुळे मी त्याची गोलंदाजी सहज खेळू शकल्याचे धवनने पत्रकार परिषदेत सांगितले. आयपीएल-11 मध्ये धवन आणि राशिद हे सनरायजर्स हैदराबाद संघातून खेळत होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी धवनने 96 चेंडूमध्ये 107 धावांची खेळी साकारत उपाहारापूर्वी शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.
अफगणिस्तानचा असाही विक्रम
अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सगळ्यात कमी षटके फलंदाजी करण्याचा विक्रम केला आहे. पाहुण्यांचा संपूर्ण संघ 27.5 षटकांमध्ये बाद झाला. याआधी न्यूझीलंडचा संघ 47.1 षटकांमध्ये बाद झाला होता. त्यानंतर बांगलादेशचा संघ दुसर्या डावामध्ये 46.3 षटकांमध्ये बाद झाला होता. अफगाणिस्तान पहिल्या कसोटीमध्ये सगळ्यात कमी षटकांमध्ये बाद झालेला संघ ठरला आहे. अफगाणिस्तानचा संघ सगळ्यात जास्त धावांच्या फरकाने फॉलोऑन घेणारा संघ आहे. अफगाणिस्तान या सामन्यात पहिल्या डावात 365 धावांनी मागे होता. वेस्ट इंडिजने 1928 मध्ये 224 धावांच्या अंतराने फॉलोऑन खेळली होती.