दुसर्‍या बापाचा म्हणतील ना!

0

आज आपल्या देशातल्या बहुतांश लोकांची नोटबंदीने झालेली स्थिती पाहिली की, ओशो रजनीशांच्या पुस्तकात वाचलेली एक कथा आठवते. एक राजा असतो. त्याच्या मनात अचानक काहीतरी येते व तो दरबार बोलवतो. त्या भरलेल्या दरबारात तो अशी घोषणा करतो की, जो कोणी मला स्वर्गातील कपडे आणूण देईल, त्याला मी एक लाख सोन्याच्या मोहरा देईन. सगळा दरबार चिडीचूप होतो. कोणच ते आव्हान स्वीकारण्यास पुढे येत नाही. नंतर राजाच्या इच्छेची दवंडी राज्यभर दिली जाते. त्या राज्यात एक अवलिया असतो. तो राजाचे आव्हान स्वीकारतो. पण, त्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागून घेतो. तोपर्यंत एक चांगला महाल मागून घेतो. राजाही त्याची अट मान्य करतो. अखेर तो दिवस उजाडतो. तो माणूस राजाला निरोप पाठवतो. सांगतो की, स्वर्गातील कपडे आणण्यासाठी एक छान सोन्याची पेटी पाठवा. राजा सोन्याची पेटी पाठवतो. दरबार भरवला जातो. सगळे प्रजाजन ते स्वर्गातले कपडे पाहण्यासाठी गर्दी करतात. तेवढ्यात तो अवलिया हातात पेटी घेवून दरबारात येतो. आता दरबारातल्या प्रजाजनांची उत्सुकता चांगलीच वाढलेली असते. तो अवलिया अत्यंत शांतपणे, दिमाखात येतो. ती स्वर्गातल्या कपड्यांची पेटी मधोमध ठेवतो. तो म्हणतो, मला देवाने सांगितले आहे की, जो कोणी त्याच्या स्वत:च्या बापाचाच असेल त्यालाच हे कपडे दिसतील. जो दुसर्‍या बापाचा असेल त्याला हे कपडे दिसणार नाहीत. सगळा दरबार शांत होतो. प्रत्येकाच्या मनात संशय येतो. आपले काय, आपल्याला दिसणार का कपडे? तेवढ्यात तो अवलिया राजाला म्हणतो, महाराज हे कपडे देवाने तुम्हाला परिधान करावयास सांगितले आहेत. महाराज काढा ती तुमच्या डोक्यावरील टोपी अन् स्वर्गातील टोपी परिधान करा. तो हळूच पेटीत हात घालतो व टोपीच्या दोन कडा पकडल्यासारखा हात वरती काढतो. महाराज ही घ्या टोपी म्हणतो. अख्खा दरबार त्या हाताकडे पाहत असतो. त्याच्या हातात तर काहीच दिसत नाही. हात मोकळाच असतो. पण, म्हणायचे कसे? दरबारात चुळबुळ सुरू होते. पण, बोलायचे कसे? बोलावे तर आपण दुसर्‍या बापाचे. कदाचित, आपणच दुसर्‍या बापाचे असू म्हणूण आपल्याला टोपी दिसत नसावी, असा स्वत:वरच संशय राजासह प्रजेच्या मनात येतो. राजा निमुटपणे ती टोपी घेवून घातल्यासारखे करतो. परत तो म्हणतो, महाराज आता हा अंगावरचा अंगरखा काढा व स्वर्गातला घाला. राजा अंगातला अंगरखा उतरवतो. तो ही पेटीतून अलगदपणे अंगरखा काढतो व राजाला देतो. त्याच्या हातात काहीच नसते. पण, बोलायचे कोणी? परत तो अवलिया म्हणतो, महाराज आता विजार काढा. आता मात्र राजा दचकतो पण करणार काय? काढतो व स्वर्गातली विजार घालतो. कपडे नसतातच. निव्वळ अभिनय सुरू असतो. तो अवलिया राजाला नागडा करतो. पण, दरबारातले सर्व प्रजाजन राजाची स्तुती करत असतात. व्वा महाराज व्वा! स्वर्गातल्या कपड्यात तुम्ही खुपच सुंदर दिसताहात. रुबाबदार दिसताहात. तुमचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसते आहे. राजा अवघडलेला असतो. प्रजेसमोर नागडाच उभा असतो. पण, करायचं काय? मोठे धर्मसंकट असते. त्याने फसवलं म्हणावे तर प्रजा आपल्याला दुसर्‍या बापाचा म्हणेल. तिच अवस्था प्रजेचीही झालेली असते. परत तो अवलिया म्हणतो, महाराज, मला देवाने सांगितले आहे की, हे कपडे घालून राजाची मिरवणूक राज्यातून काढा. आता मात्र राजाच्या अंगावर काटा येतो. या बाबाने आपल्याला दरबारात नागडे केलेच आहे. आता संपूर्ण राज्यात नागडे फिरवणार का? तो म्हणतो की, महाराज सर्व राज्यात दवंडी द्या की, जो कोणी खर्‍या बापाचा असेल त्यालाच हे कपडे दिसतील. मिरवणुकीसाठी रथ सजवला जातो. बाया-बापडे सगळे आलेले असतात. लहान लहान मुलेही कुणा कुणाच्या अंगा-खांद्यावर असतात. मिरवणूक राजवाड्याच्या बाहेर येते. पाहतात तो काय? अगडबंब नागडा राजा रथात उभा असतो. पण, बोलायचे कसे? मात्र, त्या गर्दीत लहान मुलेही होती. लहान मुले निष्पाप असतात. त्याच्या ठायी दंभ नसतो. ती राजा नागडा, राजा नागडा म्हणूण ओरडू लागली. त्यांच्या नजरेला जे सत्य दिसले ते त्यांनी सांगितले. पण, ज्याचे मुल असे म्हणेल तो गर्दीतून बाहेर जाई. कारण आपले मुल हे आपले नाही, असे बाकीचे म्हणतील ही त्याला भीती. त्यामुळे हळूच मुलाला घेवून ते सटकत होते. मात्र, राजा नागडा होता हेच सत्य होते. पण, ते मांडायची धमक ना राजाच्यात होती ना जनतेत होती. आज नोटबंदीवरून सर्व देशाचीच अशी अवस्था झाली आहे. पण, देशभक्तीच्या ज्वराने ती दाबून ठेवली आहे. प्रत्येकालाच त्रास होतोय पण बोलणार कसे? सर्वात वाईट अवस्था मूर्ख भक्तांची झाली आहे. देशभक्तीचा तथाकथीत दंभ व किडा गप्प बसू देत नाही. त्यातच ‘गिरेंगे तो भी टांग उपर’, ही प्रवृती. जे कोणी सत्य सांगताहेत, बोलताहेत, लिहितायत त्यांना काँग्रेसवाले, देशद्रोही, केजरीवाल समर्थक म्हणूण हिणवायचे. वरती भक्तगणांचे फुकाचे सल्ले, देशभक्तीचे डोस सुरूच आहेत. भक्तांनाही जाणवते आहे. पण, म्हणायचे कसे ? वरील कथेतल्या सारखी त्यांची अवस्था झाली आहे. सत्य स्वीकारले तर दुसर्‍या बापाचे म्हणतील ना?

– संपादक वज्रधारी
दत्तकुमार खंडागळे