निवडणुकीसाठी भाजप – मनसेमध्ये चढाओढ
पुणे : महामेट्रो व महापालिका संयुक्तपणे करणार असलेल्या कर्वे रस्त्यावरील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी भाजपने केली आहे. त्याला हरकत घेत मनसेने या पुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाला समोर ठेवून या मागण्या करण्यात येत असल्या तरी त्याचा अंतिम निर्णय महापालिकेतच होणार आहे. विशेष म्हणजे अजून या पुलाचे कामच सुरू झालेले नाही. त्यापूर्वीच त्याच्या नामकरणाचा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यापूर्वीच त्याचे भूमिपूजन केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात 35 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. महामेट्रो कंपनी त्यात 25 कोटी रुपये खर्च करणार आहे. मेट्रोच्या खांबांलाच हा पूल जोडण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच पूल असणार आहे. त्याला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव मोहोळ यांनी महापालिकेत दिला असल्याची चर्चा आहे. मोहोळ या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यासाठीच त्यांची ही मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाजपेयी यांचे नाव चांदणी चौकातील उड्डाणपुलाला द्यावे
मोहोळ यांच्याबरोबरच मनसेलाही कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी या पुलाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावेअशी मागणी केली आहे. कोथरूड हे शहरातील विकसित झालेले पहिले उपनगर आहे. ते विकसित होण्यात बाळासाहेब ठाकरेंचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात यावे. वाजपेयी यांचे नाव द्यायचेच असेल तर ते चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाला द्यावे अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस वकिशोर शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.