दूधदरवाढीचा दूध संघाना फटका

0

मुंबई (सीमा महांगडे – राणे) – शेजारच्या राज्यांमध्ये सरकारने दुधाला अनुदान दिले जात असून ते थेट उत्पादकांच्या खात्यात जमा होते. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रातही लागू करावे अशी मागणी दूध महासंघाने केली आहे. पुढारलेल्या म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र दुधाला अनुदान तर सोडाच, पण हा धंदाच मोडण्याची सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक संघ दोन्ही तोट्यात असल्याचे मत दूधसंघांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

अमूलने पिशवीबंद दुधाबरोबरच प्रक्रिया पदार्थाची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांना मोठा फायदा होतो. आता राज्यांमध्ये भविष्यात अतिरिक्त दूध होण्याची शक्यता आहे. या दुधाला बाजारपेठ येथे उपलब्ध करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. भविष्यातील धोक्याचा विचार न करता केवळ संपकरी शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी दरवाढीचा वापर करण्यात आला. मात्र याचा फटका सहकाराला बसत आहे. सोबतच यामुळे दूधसंघाना तारेवरची कसरत करावी लागत आहे अशी प्रतिक्रिया दूध महासंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी व्यक्त केली.

दूधसंघांची तारेवरची कसरत
शेतकऱ्यांसाठी सरकारने दुधाचे दर वाढवले असले तरी त्याचा तोटा दूधसंघाना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त पैशांशिवाय दूध संकलन, वाहतूक, चिलींगसाठी खर्च येतो. हा आणखीचा भुर्दंड या सगळ्या बरोबर दूध संघाना पडतो त्यामुळे दूध संघ चालवायचे कसे हा प्रश्न पडला आहे अशी खंत प्रतिनिधींनी व्यक्त केली.

दूध उत्पादकांना रास्त भाव मिळावा यासाठी राज्य शासनाने अनुदान द्यावे ही आमची मागणी आहे. त्यामुळे त्याचा अतिरिक्त भार दूध संघांवर येणार नाही आणि आम्हाला तारेवरची कसरतही करावी लागणार नाही. याचसोबत अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी ते दूध सरकारने विकत घेण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आम्ही दुग्धविकास मंत्र्यांकडे करणार आहोत.
मंदाकिनी खडसे, अध्यक्षा, राज्य दूध महासंघ