दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे विधानपरिषदेत आवाहन
हे देखील वाचा
नागपूर-राज्य सरकार दूध उत्पादक आंदोलनकर्त्यांशी चर्चेला तयार आहे,या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने संबंधित नेत्यांनी चर्चेला यावे असे आवाहन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानपरिषदेत केले. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातले साठ टक्के दुधसंघ खाजगी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दुधाचे थेट अनुदान देणं शक्य नाही असे सांगत दूध भुकटीला प्रतिकिलो पन्नास रुपयांचे अनुदान दोन महिन्यांऐवजी पाच महिन्यांपर्यंत देण्यात येईल अशी घोषणा जानकर यांनी यावेळी केली . तसंच दुधाला प्रतिलीटर अनुदान देण्याबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत तात्काळ बैठक घेऊन या बैठकीला विरोधकांसह संबंधित नेत्यांना बोलावले जाईल असे त्यांनी सांगितले.
दूध उत्पादक शेतकाऱ्याला आणखी चांगला भाव मिळावा यासाठी सत्तर तीस चा कायदा आणणं गरजेचं आहे या कायद्यानुसार सत्तर रुपये शेतकऱ्याला तर तीस रुपये प्रक्रिया केंद्राला मिळतील या, कायद्यामुळे बहुतांश प्रमाणात नियंत्रण येईल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला .जानकरांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा पंधरा आणि नंतर पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
या चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारने दूध भुकटीला किलोमागे जाहीर केलेले पन्नास रुपयांचे अनुदान पुरेसे नाही असं सांगत हे अनुदान दुप्पट करून ते सहा महिन्यांसाठी द्यावं आणि दुधासाठी प्रतिलीटर पाच रुपये शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा करावेत अशी मागणी केली. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशील असून सरकारच्या धोरणांमुळे दुधाचा धंदा मोडकळीस आला आहे असा आरोप त्यांनी केला. सरकारने गेल्या वर्षी गायीच्या दुधाला २७ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३६ रुपये प्रतिलीटर भाव देण्याचं जाहीर करूनही शेतकाऱ्याला प्रत्यक्ष १६ ते १७ रुपयेच मिळतात याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले. एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल मुंडे यांनी केला आहे.
भाजपाचे सुरेश धस, शिवसेनेच्या नीलम गोर्हे यांनी या चर्चेत बोलताना दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधल्या वितरण व्यवस्थेवर नियंत्रण आणण्याची मागणी केली .नीलम गोर्हे यांनी इतर राज्यातून येणाऱ्या दुधावर प्रतिलीटर तीन रुपयांचा कर लावून गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी दुधसंघ अत्याधुनिक करावेत अशी मागणी केली .