राज्य सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा
मुंबई :- दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले स्पष्ट केले.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दूध दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारच्यावतीने रविवारी मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत चर्चेसाठी निरोप देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (ता.7) रोजी दुपारी 2 वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. संघर्ष समितीने चर्चेच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. मात्र, दूध प्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी सरकार कशा प्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चे अगोदर सरकारने प्रस्ताव द्यावा अशी विनंती संघर्ष समितीने केली आहे. सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास नक्की चर्चा करू अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते हा अनुभव पाहता समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रति लिटर 27 रुपये दर व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण या मागण्या संपूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.