दूध पावडरचे भाव कोसळले

0

पुणे । दुध पावडर वरती दूध व्यवसायिकांचे सर्व आर्थिक गणित अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखिल दूध पावडरला चांगली मागणी असल्याने व्यवसायिक दूध पावडर बनवितात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दूध पावडरचे दर 110 पर्यंत खाली घसरल्याने देशात पाच लाख टन दूध पावडर शिल्लक आहे. त्यामुळे दूध व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. राज्यात होणार्‍या एकूण संकलित दुधापैकी चाळीस टक्के दुधाचा वापर हा पिशवी बंद किंवा अन्य प्रकारे दूध विक्रीसाठी केला जातो. उर्वरित दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. त्यातसुद्धा दुधाच्या पावडरचे प्रमाण जास्त असते. कारण या दूध पावडरचा दर ही चांगला मिळतो. पावडर अनेक दिवस ठेवतात. पण आंतरराष्ट्रीय बाजारातच दूध पावडरला मागणी कमी झाली आहे.

पावडर बनविणे झाले तोट्याचे
त्यामुळे दर प्रचंड प्रमाणात खाली घसरले आहेत. या घसरलेल्या दरामुळे दूध पावडर बनविणे आता तोट्याचे झाले आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिकांनी दूध पावडर बनविणे सुद्धा बंद केले आहे. ही पार्श्‍वभूमी असताना राज्य शासनाने सुद्धा दूध पावडर बनविणार्‍या व्यवसायिकांना प्रति लिटर तीन रुपये अनुदान देण्याचे मंजूर केले आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की, दूध पावडर परवडत नसल्याने अनेकांनी त्यांची निर्मिती बंद केली आहे.

अन्यथा शेतकरी आणि व्यावसाईक तोट्यात
दूध पावडर उत्पादकांना अनुदान देण्यापेक्षा दूध पावडर निर्यातीला अनुदान दिल्यास नक्कीच फायदा होईल, असे मत दूध व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे. हे अनुदान 25 पर्यंत असणे गरजेचे आहे. अन्यथा दूध पावडरचे दर असेच घसरत राहिले तर मात्र शेतकर्‍यांना व व्यवसायिकांना फायदा होणार नाही.

व्यावसाईकांनी अनूदान नाकारले
जे व्यवसायिक पावडर बनवित आहे. ते प्रमाण सुद्धा अल्प आहे. त्यामुळे या अनुदानाचा सुद्धा काहीच उपयोग होणार नसल्याचे दूध व्यवसायिकांचे म्हणणे आहे. याशिवाय हे अनुदान फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी हे अनुदान नाकारले आहे.