दूध भेसळप्रकरणी 1 लाखांचा दंड

0

17 ठिकाणी जप्ती; 23 लाखांचा माल जप्त

पुणे : पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) दुधात भेसळ केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांत 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून 17 ठिकाणी जप्तीची कारवाई करून 23 लाख 43 हजार 671 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात दुधात भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा करण्याबाबत कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात दूध भेसळीला चाप बसणार आहे.

दूध व अन्न पदार्थात भेसळ करणार्‍या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला जन्मठेपेची शिक्षा करण्यासंदर्भात कायदा सुधारणा करण्याचा प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात दुधात भेसळ करून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध भेसळ तपासणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. पुणे विभागातील अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दूध डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या ठिकाणांहून दुधाचे 254 नमुने घेण्यात आले. त्यात 52 दूधाचे नमुने अप्रमाणित तर 124 प्रमाणित असल्याचे आढळून आले.तर उर्वरित नमून्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

एफडीएकडून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे दूध भेसळीबाबत मोहीम राबविण्यात आली. त्यात एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून घेण्यात आलेल्या नमुन्यातून दुधामधील घटक पदार्थ तपासण्यात आले. त्यात युरीया, स्टार्च, सोयाबीन तेल, स्किमड् मिल्क पावडर यांची भेसळ केली जात असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार दंडास पात्र असलेल्या प्रकरणात एफडीएकडून दंड करण्यात आला. त्यानुसार 1 लाख 2 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.