दूरदर्शनवर आज होणार प्रकाशावरील ‘प्रकाशपर्वणी’ माहितीपटाचे प्रसारण

0

नंदूरबार । संपूर्ण भारतात दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा (ता.शहादा) या ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळावर राज्याचे पर्यटन व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालायाने ‘प्रकाशपर्वणी’ हा माहितीपट तयार केला आहे, या माहितीपटाचे गुरुवारी रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

संस्कृती अजूनही अप्रकाशित : प्राचीन खानदेशात अनेक नगरे विविध कारणांमुळे भरभराटीला आली. त्यांना धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले होते, त्यातील महानगरांना लागून जी होती त्यांचा विकास झाला. प्रदेश, देश यांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी ग्लोबलायझेशनच्या युगातील पर्यटनस्थळे म्हणून विविध उच्चांक नोंदवले. पण प्रकाशे नावाने जन्माला आलेली ही संस्कृती अजूनही अप्रकाशित राहिली. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली या माहितीपटाची निर्मिती नंदुरबारच्या जिल्हा माहिती कार्यालयाने केली आहे. माहितीपटाची संकल्पना व संशोधन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले असून त्यासाठी श्रीमती अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी संशोधन सहाय्य केले आहे. ब्रिज कम्युनिकेशन जळगावच्या मिलिंद पाटील यांनी या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

सौ बार काशी, एक बार परकाशी : ‘सौ बार काशी, एक बार परकाशी ’ या भावनिक उदघोषाने भारताच्या धार्मिक आणि आध्यत्मिक विश्वाला युगेनुयुगे व्यापून असलेली पुण्यभूमी म्हणजे प्रकाशा. अशा कितीतरी धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बिरुदावल्या, आख्यायिकांचा कथा प्रकाशाच्या बाबतीत ऐकवल्या,सांगितल्या जातात. परंतु ‘प्रकाशा’ संस्कृतीच्या गर्भात दडलेला खरा इतिहास फारच कमी लोकांना ठाऊक आहे. उत्तर हरप्पन संस्कृतीपासून वर्तमान युगापर्यंत धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचं भारतीय उपखंडातील प्रमुख केंद्र असलेल्या ‘प्रकाशा’चे काही अप्रकाशित कवडसे ‘प्रकाशपर्वणी’ या माहितीपटातून समोर येणार आहेत. हा माहितीपट जिल्हावासीयांनी अवश्य पहावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.