शिरपूर । शहरात स्वच्छता अभियानाचा बोलबाला सुरू असतांनाच गेल्या महिन्यांभरापासून येथील नागरीकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे या मागणीसाठी भाजपाकडून नुकतेच न.पा.चे प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अनेक पदाधिकार्यांसह नगरसेवक व नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत. त्यांनी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
स्वच्छ व निर्जंतूक पाण्याचा पुरवठा करा
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शहरातील भवानी टेक, पां.बा.माळी हायस्कूल, रथ गल्ली, राजपूत वाडा, क्रांतीनगर, जनतानगर, या भागांसह शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या एक महिन्यापासून दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या पिवळसर दुषित पाण्यामुळे पोटाचे विकार, घश्या संबंधी आजार, मलेरीया आदी आजारांच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे दवाखान्यात गर्दी होत आहे. शहरात मोठ्या स्वरूपात स्वच्छता अभियानाचा गवगवा होत असतांना पिण्याचा पाण्याचा स्वच्छ पुरवठा होण्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छ व निर्जंतूक पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी विनंती भाजपाच्या पदाधिकारी व शहरातील रहिवाश्यांकडून केली जात आहे. या निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बबन चौधरी, न.पा.चे विरोधी पक्ष नेते राजेंद्र गुलाबसिंग राजपूत, चंदनसिंग राजपूत, हेमंत पाटील, अरूण धोबी, हेमराज राजपूत, आबा धाकड, विक्की चौधरी, रोहित शेटे, संजय आसापुरे, रविंद्र भोज यांसह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.