पुणे । आयुष्यात येणार्या प्रत्येक आव्हानांचा सामना करीत अंधारात चाचपडत प्रकाशवाटा शोधणार्या चिमुकल्यांना आनंदाचे दोन क्षण हास्योत्सवाने मिळवून दिले. हास्याचे विविध प्रकार समजून घेत त्याप्रमाणे हास्ययोगाचा आनंद घेणार्या दृष्टीहिन मुलांच्या चेहर्यावर यावेळी निरागस हसू उमलत होते. जागतिक अपंग दिनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विशेष मुलांसह सामान्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, आम्ही तुमच्यातीलच एक आहोत, असे सांगत एकोप्याचा संदेशही दिला.
मुलांना फळे आणि खाऊचे वाटप
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव पार्क येथील अंध-अपंग शाळेमध्ये करण्यात आले. यावेळी मोहन जोशी, रमेश बागवे, चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, संगीता तिवारी, अॅड. सुरेश बोराटे, चित्रा माळवे, शलाका मरोड, अॅड. शाबीर खान, निलेश बोराटे, शिलाल रतनगिरी, चेतन आगरवाल, सन्मितसिंग चौधरी आदी उपस्थित होते. संस्थेतील मुलांना फळे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
विविध सामाजिक उपक्रम
जोशी म्हणाले, दृष्टीहीन मुले ही कोणाचा तरी आधार घेऊन आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची साथ देत त्यांच्या आयुष्यात आनंदाने क्षण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. याशिवाय जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, पीयुसी चाचणी शिबिर अशा अनेक सामाजिक उपक्रमही आयोजित केले होते.