यवतमाळ:लग्नानंतर देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा अपघात होऊन नववधूसह तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडली आहे. यात ७ जण जखमी झाले आहे. यवतमाळमधील मारेगावजवळ ट्रक आणि कारचा अपघात झाल्याने ही घटना घडली.
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत असताना मारेगाव येथे यवतमाळवरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन जण जागीच ठार झाले. तर उपचारासाठी नेत असताना नववधूचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे (वय ६०), सानिका किसन गोपाळे (वय २०) आणि नववधू साक्षी देविदास उपरे (वय १८) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे. जखमींमध्ये राजनंदिनी सुनिल पवार (वय ४) , साधना कोंडबा गोंधरे (वय ३५ ), पूजा शंकर उपरे (वय २०), चंपाबाई बाबा पेंडलेवार (वय ७०) यांचा समावेश आहे.
रात्री मारेगाव पोलीस पेट्रोलिंग करीत होते. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्वरित १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांनी लगेच खासगी वाहन चालकांना संपर्क करत जखमींना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गेल्या १२ तासांमध्ये राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. संगमनेरमधील घारगाव येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन जणंना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला असून अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे. त्यापूर्वी कोल्हापूरमध्येही कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.